सोलापूर महापालिका आयुक्त दीपक तावरे यांची बदली; सिवसंकर नवे आयुक्त
शुक्रवारी सायंकाळी निघाले बदलीचे आदेश
by एजाजहुसेन मुजावरसोलापूर महापालिकेचे आयुक्त दीपक तावरे यांची शुक्रवारी अचानकपणे बदली झाली असून, त्यांच्या जागेवर राज्य वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पी. सिवसंकर यांना नियुक्त करण्यात आले आहे. तर, तावरे यांना सिवसंकर यांच्या जागेवर वखार महामंडळाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या बदलीचे आदेश शुक्रवारी सायंकाळी निघाले.
सध्या सोलापुरात करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तावरे यांना प्रशासकीय कामकाजातील नरमाई भोवल्याचे बोलले जात आहे. त्यांनी करोना संकटात अहोरात्र काम केले तरी प्रसंगी कठोर पावले उचलण्याची अपेक्षा असताना, तावरे यांनी तशी खंबीर भूमिका न घेता मवाळ पध्दतीने प्रशासन चालविल्याचा आक्षेप घेण्यात येत होता. विशेषतः भाजपच्या ताब्यात असलेल्या सोलापूर महापालिकेचा कारभार चालवितानाही तावरे हे पालिका पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना समाधानी करू शकले नसल्याचेही बोलल्या जात होते.
नवनियुक्त सिवसंकर यांच्याकडे अलिकडे शहरात करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनामध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. आता त्यांनाच पालिका आयुक्तपदी नियुक्त करण्यात आले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.