BLOG: …संशयितांच्या रांगेतलं कुटुंब, अन् रिपोर्टची धाकधुक
प्रत्येक पाऊल पुढे टाकताना शरीर अस्वस्थ होत होतं
by लोकसत्ता ऑनलाइनमनोज भोयर
(लेखक जय महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे सहसंपादक आहेत.)
२१ एप्रिल रोजी संध्याकाळी मला अशक्तपणा आला. अंगात थोडा तापही होता. तेव्हाच मी निर्णय घेतला… आता घरात थांबायचं नाही…
वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने सरांसोबत कामानिमित्त खुपदा बोलणं व्हायचं. म्हणून मग मी डॉ. लहानेंना माझी संपूर्ण माहिती कळवली. यावर त्यांचा सल्ला असा होता की, तुला जर रात्रीत जास्त ताप आला तर तू सकाळी थेट सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये भरती हो… आणि झालंही तसंच… रात्री ताप जास्त वाढला,झोप नीट झाली नाही ..अधिक जोखीम नको म्हणून सकाळी उठल्यावर माझ्या पत्नीने मला कोविड -19 साठी आरक्षित करण्यात आलेल्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. बॅग अक्षरशः मुक्काम करण्याच्या इराद्याने जमेल तशी कोंबली आणि बर्मुड्यावरच मी घरून निघालो होतो . पत्नी नेहाला रुग्णालयातून ताबडतोब निघून जायला सांगितले. कारण ती जागा फारच संवेदनशील होती.
रुग्णालयात पोहचल्यानंतर मी माझा केस पेपर काढला. त्यानंतर प्राथमिक तपासणीसाठी रांगेत उभा राहिलो. तेव्हा रांगेत अत्यावश्यक सेवेत काम करणारे बहुतांश कर्मचारी उभे होते. या रुग्णालयात मी अनेकदा वेगवेगळ्या कारणांसाठी आलो होतो पण कधीही हे रुग्णालय माझ्या अंगावर आलं नव्हतं. प्रत्येक पाऊल पुढे टाकताना शरीरात पसरणारी अस्वस्थता येत होती आणि त्यावर मी मात ही करत होतो. मात्र माझ्या चेहऱ्यावर कुणाला ही अस्वस्थता वाचणं तसं अवघड होत.
प्राथमिक तपासणी झाल्यानंतर माझी थेट संशयित करोना रुग्णांच्या वॉर्डात दाखल झालो . त्या वार्डामध्ये अत्यंत गरीब वर्गातील सर्वाधिक रुग्ण दाखल झाले होते. माझ्या काही आवश्यक चाचण्या घेतल्या गेल्या त्याही अत्यंत नॉर्मल आल्या त्यामुळे जीव थोडा हलका झाला. बाजूच्या बेडवर पोलीस कॉस्टेबल होते आणि त्यांच्या बाजूला करोनाची लागण झालेल्या एका नर्सच्या घरातले संशयित तीन कुटुंब सदस्य. या नर्स, त्यांची चिमुकली दोन मुले आणि त्यांचे पती हे बाजूच्याच पॉझिटिव्ह करोना वॉर्डात उपचार घेत होते. म्हणजे एकाच घरात चार करोना पाझिटिव्ह आणि तिघे रिपोर्ट येण्याच्या प्रतिक्षेत माझ्यासोबत. किती मोठ्या संकटाचा सामना एकाचवेळी करत हे संपुर्ण कुटुंब या रुग्णालयात दाखल झालं होतं. पोलीस, डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांना करोनाची लागण होण्याचे हे अगदी सुरुवातीचे दिवस होते. माझ्यापेक्षा अत्यंत धोकादायक परिस्थितीत हे सर्वच सरकारी कर्मचारी काम करता करता अखेर लागण झाल्यामुळे रुग्णालयात दाखल होत होते.१९ एप्रिल रोजी राज्यात करोना बाधितांची एकूण संख्या ४२०० आणि मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाची संख्या होती २२३ ,दरदिवशी रुग्णाची संख्या ५५२ ने वाढत होती आणि दरदिवशी मृत्यू पावणाऱ्या रुग्णाची संख्या होती १२ आणि यात मुंबईचं प्रमाण हे राज्यात सर्वाधिक होतं. त्या काळात मी रुग्णालयात होतो. लेख लिहीत असताना २५ मे रोजी राज्याची करोनाबाधितांची संख्या ही ५२,६६७ झाली होती आणि मृतांची संख्या ही १६९५ पर्यंत पोहोचली होती आणि दरदिवशी राज्यात रुग्ण वाढणाऱ्यांचं प्रमाण हे २४३६ इतकं झालं होत.
मुंबईत ३१,९७२ करोनाबाधित आणि मृत्यू संख्या झपाट्याने वाढत १०२६ झाली होती. यावरून कल्पना येईल करता येईल की मुंबईत आणि राज्यात करोनाची लागण होणाऱ्यांच्या प्रमाणात किती वेगानं वाढ हात होती. त्यामुळे त्याचा राज्य सरकारवर किती भयंकर ताण पडत होता. आपत्कालीन व्यवस्थेत काम करणारे आणि सर्वच या परिस्थितीचा निकराने सामना करण्यासाठी रात्रंदिवस झटत होते आणि त्यातले काही करोनाला बळीही पडत होते. हे सर्व विस्ताराने सांगण्याचं कारण म्हणजे यातले काही माझ्या अवतीभवती होते. काही काळासाठी मी त्यांच्याच काळजीत विचार करत होतो. तेव्हा लक्षात आलं की आपल्याला करोनाची लागण झाली आहे असा विचार करूनच यापुढे येणाऱ्या दिवसाचा सामना करायचा आहे.
माझ्या वॉर्डात दुसऱ्या भागात बेडची भली मोठी संख्या होती आणि त्यात अनेक व्याधींनी त्रस्त तरुण आणि वृद्ध रुग्णही होते. प्रातर्विधीसाठी जाताना प्रत्येकाच्या वेदना सहज त्यांच्या चेहऱयावर वाचता येत होत्या. उपलब्ध शौचालयात अतिशय घाण पसरली होती आणि ती पसरली म्हणण्यापेक्षा लोकांनी पसरवली होती. डस्टबिन तसेच भरून वाहत होते. आहे त्यात मार्ग काढून पुढे जाण्याशिवाय काही उपाय नव्हता. लोकांची म्हणून काही आपली जबाबदारी असते ती ते सार्वजनिक ठिकाणी किती पाळतात हे आता सर्वांनाच माहिती झाले आहे. त्यामुळे त्यावर डोके पिटण्यात मला आता काही अर्थ वाटत नाही. तसाही सार्वजनिक ठिकाणी अस्वस्च्छतेचा आपल्याला शापच आहे. अपुऱ्या मनुष्यबळात रुग्णालयातल व्यवस्थापन सांभाळणं ही तारेवरची कसरत होती. त्याही अवघड परिस्थितीत सर्व स्टाफ सर्व रुग्णांची नीट काळजी घेत होता. बाकी लोकांच्या अपेक्षा या खूप असतात त्या पूर्ण करणं किमान या काळात तरी कठीण होतं.
सकाळच्या जेवणाची वेळ झाली, रांगेत उभं राहून प्रत्येकाला जेवण घ्यावं लागायचं घेतलं. ते मी ही घेऊन निवांतपणे माझ्या बेडवर पडलो होतो. तितक्यात डॉक्टर आले आणि त्यांनी माझ्या नाकातून स्वॅब घेवून करोनाची टेस्ट घेतली. काही औषध दिली. म्हणजे एक टेस्ट पुरेशी नव्हती. सरकारी टेस्ट नंतरच खरं निदान होणार होतं. आता माझ्याकडे बराच वेळ होता. धकाधकीच्या महिन्यानंतर माझ्या गाडीला अचानक ब्रेक लागला होता. ज्या जीवघेण्या जगाचा आत्तापर्यंत मी बाहेरून वेध घेत होतो त्या जगातच आज माझा थेट प्रवेश झाला होता. आजपर्यंत मुंबईतली गेल्या वीस वर्षातली अशी एकही महत्वाची घटना नसेल ज्याचं रिपोर्टींग थेट त्या जागी जाऊन केलं नसेल. अपवाद फक्त करोना रुग्णालयाचाच होता. बैचेनीमध्ये सुद्धा मनाला जरा मागे सरलेल्या दिवसात घेऊन गेलो. यावेळेस चॅनलमध्ये माझी भूमिका वेगळी होती. काही भूमिका मी परिस्थितीनुसार वठवत होतो. स्टुडिओमध्ये बसून तासनतास अँकरिंग करत होतो. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यापासून अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि कृषीमंत्री दादा भूसे यांच्या लाईव्ह मुलाखती स्काईपवर घेत होतो. सातासमुद्राच्या पलीकडे करोनाने जो कहर माजवला होता, तो जाणून घेण्यासाठी पाकिस्तान, बांग्लादेश, चीन, अमेरिका या देशांतील भारतीयांसोबत आणि तज्ज्ञांसोबत मुलाखतींव्दारे चर्चा करत होतो. लोकांचा ताण घालविण्यासाठी म्हणून जेष्ठ गायिका पद्मजा फेणाणी आणि विनोदी अभिनेता भारत गणेशपुरेंच्या मुलाखती सुद्धा घेऊन झाल्या. रोजच्या बातम्यांचे राज्यभरातून वेगाने येणारे बातम्यांचे अपडेट्स होतेच. त्याचा सामना रोजच करावा लागत होता. तसा महिना स्ट्रेसफुलच गेला. घरातून कामासाठी बाहेर पडणं हीच मुळात मोठी रिस्क होती. या रिस्कमुळे घरातले सुद्धा अडचणीत येणार होते. पण तरीही ती घेतली जात होती. तशी ती गुजरात दंगलीपासून घेण्याची सवयच लागली होती. माझे अनेक सहकारी दुरून दुरून जोखिम स्वीकारत ऑफिसला येतच होते. आणि त्यात मुलींची संख्या विशेष होती. तासनतास ते काम करत राहायचे. रोज वेगवेगळ्या संकटावर मात करायचे.
या अशा आठवणीत काही वेळ गेला तशी त्या दिवसाची माझी रात्रही गेली.
२३ एप्रिलची सकाळ उजाडली ती काळजीनेच .आपला रिपोर्ट पॅाझिटिव्ह आला आणि कोरोनची लागण जर कुटुंबात इतरांना झाली तर पुढे काय करायचं या विचारात मी असतानाच माझ्या पत्नीचा माझ्या आणि तिच्या टेस्टचा रिपोर्ट जाणून घेण्यासाठी सतत फोन येत होता.ते खूप स्वाभाविकही होतं.
रिपोर्टला वेळ लागणार होताच .पुन्हा तिचा फोन आला पण काही माहिती देणारा,ती सांगत होती की, चेंबूरच्या शिबिरामध्ये केलेल्या सर्व टेस्टचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले असल्याची माहिती आहे ,तू कन्फर्म कर आपलं काय झालं, खात्री करण्यात बराच वेळ गेला .कारण टेस्टचे रिपोर्ट माझा आयोजक पत्रकार मित्र मनोज चंदेलियाच्या मेलवर येणार होते.त्यालाही कॉल करून झाले. तो ही म्हणाला की सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.पण मला ऑथेन्टिक मेल हवा होता.माझा मित्र रवी आंबेकर यालाही तपास करायला सांगितलं कारण तो टेस्टच्या वेळेस उपस्तित होता.मधल्या वेळेत मी उत्साहात डॉक्टरांनां रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं सांगूनही टाकलं.काहीवेळ असाच गेला. त्या कॅम्पमध्ये पहिली टेस्ट माझीच झाली होती. आणि त्यानंतर माझ्या पत्नीची. तरी रिपोर्ट यायला उशीर का होत होता काही कळत नव्हतं. माझी चिंता वाढतच होती. पत्नीने लॅबचा पत्ता मिळवून माहिती काढली आणि मलाच दिली,माझा रिपोर्ट पॉझीटिव्ह आणि तिचा निगेटिव्ह.तिचा निगेटिव्ह म्हणून खूप आनंद तर माझा पॉझीटिव्ह म्हणून पुन्हा अस्वस्थता.पण आता हे सर्व रिपोर्ट्स मेलवर मिळवायचे होते .तितक्यात मला एक फोन आला. तो फोन ठाण्याच्या इनफ्लेक्स लॅबमधून आला होता.माझा पत्ता त्यांनी मागवला होता. मी त्यांना विचारत होतो झालं काय ते तरी सांगा हो . मला माझा रिपोर्ट मिळेल का? पण मला त्यांच्या बोलण्यावरून अंदाज आला होता, की माझा रिपोर्ट पॅाझिटीव्ह आहे. शेवटी माझ्याकडे त्यांनी मेल आयडी मागून त्यांनी माझ्या पत्नीचा रिपोर्ट मला मेलवर पाठवला.तो मी तिला व्हाट्स अप वर पाठवून दिला ,अर्थातच तिला तिच्या ऑफिसला सुद्धा ही माहिती तातडीने कळवायची होतीच.मागाहून माझा रिपोर्ट मनोज चंदेलियाने मेलवर पाठवला तो पॉझीटिव्हच होता. सेंट जॉर्ज रुग्णालयाचे सुपेरिटेंडेंट डॉक्टर आकाश खोब्रागडे यांना मी माहिती दिली आणि माझा या रुग्णालयात घेतलेला रिपोर्ट सुद्धा पॉझिटिव्ह असल्याची माहिती त्यांनी दिली आणि काही काळजी करू नका तुम्ही लवकर बरे व्हाल असा धीरही दिला. पत्नीची ही मनाची घालमेल सुरु होती तिनेही खूप धीर दिला.काळजी आता मुलगा आशयची होती.कारण तो माझ्या संपर्कात आला होता. जे व्हायचं ते होऊन गेलं .अर्थातच माझी रवानगी करोना वॉर्डात होणार होती.
मी शांत मनाने पुढच्या तयारीला लागलो .
संशियत वॉर्डात या दरम्यान दोन मृत्यु झाले होते.एक ६५ वर्षाचा वृद्ध इसम वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त होता त्याचही निधन झालं होत.आणि ४० वर्षाचा तरुण दोन्ही किडन्या निकामी झाल्या म्हणुन जीवनाशी दोन हात करत मृत्यु पावला होता.अर्थात त्यांचे कोरोनचे रिपोर्ट यायचे होते आणि त्यांनी रुग्णालयात भरती व्हायला खूप उशीरही केला होता.या दोन घटनांनी वॉर्डात आणखी भीती पसरली होती.कोणी यावर फारसं बोलत नव्हते मात्र चिंता चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
या वॉर्डातून जाताना इतर ओळख झालेल्या रुग्णांनी धीर दिला ..आमचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत तर आम्हीही तुमच्या मागून येतो असं हसत हसत सांगून त्यांनी मला निरोप दिला. मीही आरोग्याची काळजी घ्या असं प्रेमाने बोलत पुढचा रस्ता धरला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.