भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा निश्चित नाही!
BCCI ने सांगितलं कारण
by लोकसत्ता ऑनलाइनकरोना विषाणूच्या तडाख्यामुळे गेले दोन-अडीच महिने ठप्प झालेलं क्रिकेट आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलं आहे. कॅरेबियन बेटांवर विन्सी प्रिमीयर टी १० लीग स्पर्धा विनाप्रेक्षक सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर अनेक क्रिकेट मालिकांच्या तारखादेखील निश्चित केल्या जात आहेत. याच दरम्यान क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले. त्या वेळापत्रकानुसार भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा ऑक्टोबरला सुरू होणार असून १७ जानेवारीपर्यंत टीम इंडिया ऑस्ट्रेलियात असणार आहे. पण एका कारणामुळे अद्याप ऑस्ट्रेलिया दौऱ्या निश्चित नसल्याचे BCCI कडून सांगण्यात आले आहे.
असा आहे ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेला भारताविरूद्धचा क्रिकेट दौरा
टी-२० मालिका
पहिला सामना – ११ ऑक्टोबर (ब्रिसबेन)
दुसरा सामना – १४ ऑक्टोबर (कॅनबेरा)
तिसरा सामना – १७ ऑक्टोबर – (अॅडलेड)
टी २० विश्वचषक – १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर (ऑस्ट्रेलिया)
बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिका
पहिली कसोटी – ३ ते ८ डिसेंबर (ब्रिसबेन)
दुसरी कसोटी (दिवस-रात्र) – ११ ते १५ डिसेंबर (अॅडलेड ओव्हल)
तिसरी कसोटी (बॉक्सिंग डे) – २६ ते ३० डिसेंबर (मेलबर्न)
चौथी कसोटी – ३ ते ७ जानेवारी (सिडनी)
वन डे मालिका
पहिला सामना – १२ जानेवारी २०२१ (पर्थ)
दुसरा सामना – १५ जानेवारी २०२१ (मेलबर्न)
तिसरा सामना – १७ जानेवारी २०२१ (सिडनी)
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेल्या दौऱ्यात टी २० विश्वचषक स्पर्धांसाठीही जागा ठेवण्यात आली आहे. पण गेले काही दिवस क्रिकेट ऑस्ट्रेलिया टी २० विश्वचषकाचे आयोजन करू शकत नसल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये झळकत आहेत. अशा परिस्थितीत BCCI चे खजिनदार अरूण धुमाळ यांनी BCCI ची बाजू स्पष्ट केली आहे. “ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा कार्यक्रम हा खूप आधी ठरवण्यात आला होता. त्यावेळी टी२० विश्वचषक स्पर्धा खेळवण्याबाबत कोणतीही साशंकता नव्हती, पण आता जर ICC यंदाच्या वर्षी विश्वचषक स्पर्धा आयोजित करणार नसेल, तर ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियात जाऊन परत येणे आणि परत डिसेंबरला ऑस्ट्रेलियात जाणे या प्रवासाला काय अर्थ आहे?”, असे धुमाल न्यू इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाले.
“यजमानपद असलेल्या क्रिकेट मंडळाला कार्यक्रम जाहीर करावाच लागतो. कारण त्यावरच प्रसारणाचे हक्क विकत घेणारे ब्रॉडकास्टर आपली रूपरेषा ठरवतात. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्याला अजून चार-पाच महिन्याचा कालावधी आहे. या कालावधीत काय घडतं त्यावर सगळं अवलंबून आहे. सध्या तरी कोणताही दौरा रद्द झालेला नाही”, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.