कुळगाव-बदलापुरात सर्व दुकानं सुरु करण्यासाठी सशर्थ परवानगी
दुकानदारांना नियमांचं काटेकोर पालन करावं लागणार
by लोकसत्ता ऑनलाइनकरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं. या काळात जीवनावश्यक गोष्टींचा अपवाद वगळता सर्व गोष्टींची दुकानं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी राज्यातील बहुतांश दुकानं व उद्योगधंदे बंद असल्यामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत होता. यामधून बाहेर येण्यासाठी राज्याच्या काही भागात दुकानं सुरु करण्याची परवानगी देण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातील कुळगाव-बदलापूर शहरात आता जिवनावश्यक वस्तूंसह सर्व दुकानं सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.
नुकतीच शहरातील सर्व लोकप्रतिनीधी, व्यापारी संघ आणि मुख्याधिकारी दिपक पुजारी यांची बैठक झाली. या बैठकीत दुकानदारांना आपली दुकानं सुरु ठेवण्यासाठी सशर्थ परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र यासाठी पालिकेने नियम आखून दिलेले असून, सोशल डिस्टन्सिंग व इतर सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करणं दुकानदारांना बंधनकारक करण्यात आलेलं आहे. “शासनाच्या नियमावरुन कुळगाव-बदलापूर हद्दीतील सर्व दुकानं सुरु करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र यासाठी सोशल डिस्टन्सिंग व पालिकेने आखून दिलेल्या सर्व नियमांचं काटेकोर पद्धतीने पालन करावं लागेल. या नियमांचं पालन होत नसल्याचं दिसलं तर पालिका प्रशासन दुकानदारांवर कारवाई करेल”, अशी माहिती मुख्याधिकारी दिपक पुजारी यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.
दुकानं सुरु ठेवण्यासाठी शहरात सध्या सम-विषमचा फॉर्म्युला राबवण्यात आलेला असून…हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक्स, जनरल स्टोअर्स यासारखी दुकानं सोमवार, बुधवार आणि शुक्रवार तर सोन्या-चांदीची दुकानं, चपलांची दुकानं, गॅरेज, लाँड्री यासारखी दुकानं मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी उघडी असणार आहेत. एकावेळी दुकानात ५ पेक्षा जास्त लोकांना न येऊ देणं, गर्दी करणं टाळणं, सॅनिटाईजरचा वापर, स्वच्छता असे नियम पालिकेने दुकानदारांसाठी आखून दिले आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.