लॉकडाउनमुळे कुटुंब नियोजनावर होतोय असा परिणाम
अनेकांनी त्यांचं फॅमेली प्लॅनिंग पुढे ढकललं आहे
by लोकसत्ता ऑनलाइन– डॉ. निशा पानसरे
करोनावर मात मिळविण्यासाठी सध्या देशात लॉकडाउन सुरु आहे. या काळात सारं काही बंद असल्यामुळे प्रत्येक जण घरात राहून स्वत:ची आणि कुटुंबियांची काळजी घेत आहे. मात्र तरीदेखील करोनाबाधितांची संख्या वाढतानाच दिसत आहे. त्यामुळे या लॉकडाउनमुळे निर्माण झालेल्या भीतीचा परिणाम कुटुंबव्यवस्थेवर आणि कुटुंब नियोजनावर होताना दिसत आहे. अनेकांनी त्यांचं फॅमेली प्लॅनिंग पुढे ढकलल्याचं दिसून येत असल्याचं डॉ. निशा पानसरे यांनी सांगितलं आहे.
१. सोशल डिस्टंसिंग तसेच नियमावलीचा कुटुंब नियोजनावर परिणाम –
करोना विषाणूमुळे सोशल डिस्टंसिंगचं आणि नियमावलींचं पालन करणं गरजेचं आहेत. हे स्वत:च्या आणि इतरांच्या आरोग्यासाठी गरजेचं आहे. त्यामुळेच या काळात आपल्या बाळावर त्याचा विपरीत परिणाम होईल अशी भीती अनेक जोडप्यांच्या मनात आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचं फॅमेली प्लॅनिंग पुढे ढकललं आहे.
२. नको असलेली गर्भधारणा –
सध्याच्या काळात अत्यावश्यक सुविधा सोडल्या तर सारं काही बंद आहे. तसंच प्रत्येकाला घरात राहण्याचं वारंवार आवाहन करण्यात येत आहे. या काळात बऱ्याच वेळा गर्भनिरोधक उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक जोडप्यांना नको असलेल्या गर्भधारणेचा सामना करावा लागत आहे.
३. आयव्हीएफ उपचारांमध्येही मंदी –
लॉकडाउनच्या काळात सक्तीने अनेक आयव्हीएफ क्लिनिक बंद आहेत. त्यामुळे आयव्हीएफद्वारे गर्भधारणा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांच्या उपचार सेवांमध्ये अडथळा आला आहे. करोना व्हायरसच्या भीतीने लोक आता घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. तसंच क्लिनिकमध्ये गेल्यावर करोनाची लागण होणार नाही ना? क्लिनिक सॅनिटाइज केलं असेल का किंवा निर्जंतुकीकरण करणारी साहित्य आणि उपकरणे आहेत का?, असे अनेक प्रश्न जोडप्यांना पडले आहेत.
४.आर्थिक नियोजन –
करोना विषाणूचं सावट संपूर्ण जगावर असल्यामुळे त्याचा परिणाम थेट अर्थव्यवस्थेवरही झाला आहे. उद्योग धंद्यांमध्येही मंदी आली आहे. कुटुंब सुरु करण्याच्या विचारात असलेल्या जोडप्यांना आता पुढे जाण्यापूर्वी आर्थिक बाबींचाही विचार करावा लागेल. मुल जन्माला घातल्यास जोडप्यांवर आर्थिक ओझे येऊ शकते.
(लेखिका पुण्यात नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटीमध्ये फर्टिलिटी कन्सल्टंट आहेत.)
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.