https://images.loksatta.com/2020/05/gambhir1.jpg?w=830
संग्रहित छायाचित्र

गौतम गंभीर यांच्या वडिलांची कार चोरट्यांनी घरासमोरून पळवली; घटना सीसीटीव्हीत कैद

चोरट्यांच्या शोधासाठी पथकांची स्थापना

by

लॉकडाउनमुळे सगळीकडं शुकशुकाट असून, गुन्हेगारी कमी झाल्याचं बोललं जात आहे. अशातच पूर्व दिल्लीचे खासदार गौतम गंभीर यांच्या वडिलांची कार चोरट्यांनी घरासमोरून पळवली. मध्य दिल्लीतील राजेंद्र नगर भागात गौतम गंभीर यांचं घर असून, बुधवारी रात्री चोरट्यांनी घरासमोरून कार लंपास केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

“गौतम गंभीर यांच्या घरासमोर बुधवारी रात्री फॉर्च्युन कार उभी करण्यात आली होती. रात्री ३:३० वाजेच्या सुमारास ही कार पार्क करण्यात आली होती. त्यानंतर चोरट्यांनी ही कार पळवली. गुरूवारी सकाळी हा प्रकार समोर आला,” अशी माहिती पोलिसांनी दिली. “खासदार गौतम गंभीर यांच्या घरासमोर पार्क करण्यात आलेली त्यांच्या वडिलांची कार चोरीला गेली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस गौतम गंभीर यांच्या घरी गेले. तिथे त्यांचे वडील दीपक गंभीर यांची भेट घेतली. दीपक गंभीर यांनी पोलिसांना सांगितलं की, ‘त्यांची टोयॅटो कंपनीची पांढऱ्या रंगाची फॉर्च्युन कार बुधवारी घरासमोर रात्री ३.३० वाजेच्या सुमारास पार्क केली होती. मात्र, गुरूवारी सकाळी कार घरासमोर नव्हती. कार चोरीला गेलेली होती,’ अशी माहिती त्यांनी दिली असल्याचं मध्य दिल्लीचे पोलीस उपायुक्त संजय भाटिया यांनी सांगितलं. पोलिसांना सीसीटीव्ही तपासले असता हा प्रकार दिसून आला. चोरट्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

दीपक गंभीर यांच्या तक्रारीवरून राजेंद्र नगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांना पकडण्यासाठी मध्य दिल्ली पोलीस आणि गुन्हे शाखेची पथक नेमण्यात आली आहे. घटनास्थळावरून चोरट्यांच्या हाताचे आणि पायांचे ठसे घेण्यासाठी न्याय वैद्यक (फॉरेन्सिक) पथकालाही बोलवण्यात आलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.