जेव्हा पाकिस्तानी फॅन्स धवनला म्हणाले, “तू १५ धावा काढून बाद होशील…”
धवनने सांगितला वर्ल्ड कप स्पर्धेतील किस्सा
by लोकसत्ता ऑनलाइनटीम इंडियाचा फलंदाज शिखर धवन मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील एक उत्कृष्ट सलामीवीर आहे. रोहित शर्मासह त्याने अनेक वेळा भारतीय क्रिकेट संघाला भक्कम सलामी मिळवून दिली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करताना शांत आणि संयमी असलेला शिखर धवन खेळपट्टीवर कायम सकारात्मक खेळ करण्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र एकदा पाकिस्तानविरूद्ध त्याच्या कानावर त्याच्याबाबत एक नकारात्मक गोष्ट आली होती. त्याबाबत शिखर धवनने भारतीय महिला संघाच्या जेमायमा रॉड्रीग्ज आणि स्मृती मंधाना यांच्या डबल ट्रबल या ऑनलाइन कार्यक्रमात एक आठवण सांगितली.
“ऑस्ट्रेलियात २०१५ मध्ये विश्वचषक स्पर्धा खेळण्यासाठी आम्ही गेलो होतो. आमचा पहिला सामना पाकिस्तानशी होता. मी जेव्हा मैदानाच्या दिशेने जात होतो, तेव्हा तिथे खूप पाकिस्तानी फॅन्स होते. ते मला पाहून ओरडू लागले की हा तर १५ धावा काढून बाद होईल. त्यावर मी काहीही बोललो नाही. फक्त होकारार्थी मान हलवली आणि पुढे निघून गेलो. पण त्यानंतर मात्र मी पाकिस्तानविरूद्ध ७३ धावा ठोकल्या. त्यावेळी तेच फॅन्स माझ्यासाठी टाळ्या वाजवताना मी पाहिले”, असे धवनने सांगितले.
पाकिस्तान विरोधात सामना खेळण्याचं दडपण असतं का? या प्रश्नावरही धवनने उत्तर दिले. “पाकिस्तान विरूद्ध क्रिकेट सामना असेल तर दडपण नक्कीच असतं. कारण मैदानावरचं वातावरण, फॅन्सची बडबड, वेगळ्या पद्धतीचं संगीत अशा विविध गोष्टी सुरू असतात. मला अजूनही आठवतंय की पाकिस्तान विरूद्ध सामना खेळायला जाताना माझ्यावर खूप दडपण होते. कारण त्या आधी ऑस्ट्रेलियात झालेल्या मालिकेत मी खूप वाईट खेळलो होतो. पण पाकिस्तान विरोधात मी चांगला खेळलो आणि मला त्याचा आनंद आहे”, असे धवन म्हणाला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.