“भारतीय क्रिकेटच्या प्रगतीसाठी विराटच योग्य”
माजी क्रिकेटपटू आणि समालोचक इयन बोथम यांचं मत
by लोकसत्ता ऑनलाइनभारताचा कर्णधार विराट कोहली याची कायम कोणत्या ना कोणत्या खेळाडूशी तुलना केली जाते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन, पाकिस्तानचा नवोदित कर्णधार बाबर आझम यांच्यात आणि विराटमध्ये सर्वोत्तम कोण असे प्रश्न बऱ्याचशा मुलाखतीत अनेकांना विचारले जातात. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सध्याचा कर्णधार विराट यांचीही नेतृत्वकौशल्याच्या बाबतीत फॅन्सकडून तुलना केली जाते. या साऱ्याबाबत संमिश्र उत्तरे मिळत असली, तरी भारतीय क्रिकेटचा विकास विराटच करू शकेल असा विश्वास माजी क्रिकेटपटू आणि समालोचक इयन बोथम यांनी व्यक्त केला आहे.
“विराट खूप प्रतिभावंत खेळाडू आहे. प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या हातात सामना जात असेल, तरी विराट मैदानावर पाय रोवून उभा राहतो आणि आपल्या सहकारी खेळाडूंचं मनोधैर्य वाढवतो. विराटच्या विरोधात खेळायला मला खूप आवडलं असतं. भारतीय क्रिकेटच्या प्रगतीसाठी विराट हाच योग्य माणूस आहे”, असे बोथम म्हणाले. अष्टपैलू खेळाडूंबद्दलही त्यांनी महत्त्वाचे मत व्यक्त केले. “अष्टपैलू खेळाडू आपोआप तयार होत नाहीत. झाडावरून फळं काढल्यासारखे ते नसतात. त्यांच्यावर कामगिरीचं दडपण दुप्पट असतं. कपिल देव यांच उदाहरण घ्या… भारतीय खेळपट्ट्यांवर त्याने खूप गोलंदाजी केली. चेन्नई आणि दिल्लीच्या कडकडीत उन्हात अजिबात मदत म मिळणाऱ्या खेळपट्टीवर गोलंदाजी करणं कधीही सोपं नसतं. सध्याच्या क्रिकेटपटूंमध्ये त्या ताकदीचा अष्टपैलू खेळाडू सापडणं कठीण आहे”, असे बोथम यांनी नमूद केले.
शोएब अख्तरने केली होती विराटची स्तुती
“मी विराटपेक्षा वयाने खूपच मोठा आहे, नाही तर विराट कोहली हा माझा एकदम खास मित्रांपैकी एक असू शकला असता. कारण आम्ही दोघेही पंजाबी आहोत. आम्हा दोघांचा स्वभाव पण एकसारखाच आहे. मी त्याच्यपेक्षा ज्येष्ठ असलो तरी मी त्याचा आदर करतो. आम्ही एकमेकांचे अगदी खास मित्र बनू शकलो असतो, पण मैदानात खेळताना मात्र आम्ही कट्टर शत्रूंप्रमाणे खेळलो असतो”, असे एका संकेतस्थळाच्या व्हिडीओ पॉडकास्टमध्ये अख्तर म्हणाला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.