“हा माझा अपमान आहे”; टीम इंडियाच्या खेळाडूचा संताप
एका ट्विटवरून घडला सारा प्रकार
by लोकसत्ता ऑनलाइनमहेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स संघाने IPL 2012 चे विजेतेपद पटकावले. धोनीच्या संघाने १९० धावांचे विशाल आव्हान कोलकातापुढे ठेवले होते. ते आव्हान कोलकाताने अवघे दोन चेंडू राखून शेवटच्या षटकात पूर्ण केले. मनविंदर बिसला या सलामीवीराने ४८ चेंडूत ८९ धावांची तुफानी खेळी केली, त्यामुळे कोलकाताला महाकाय आव्हान पार करणे शक्य झाले होते. बिसलाला सामनावीर तर फिरकीपटू सुनील नारायणला मालिकावीराचा किताब देण्यात आला होता.
दोन दिवसांपूर्वीच (२७ मे) या विजेतेपदाला ८ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्त कोलकाता नाईट रायडर्स संघाने आपल्या जुन्या आठवणींना ट्विटच्या माध्यमातून उजाळा दिला. विजेत्या संघात भारतीय संघातून खेळणारे किंवा खेळलेले गौतम गंभीर, युसुफ पठाण आणि मनोज तिवारी हे तीन खेळाडू होते. पण ट्विटमध्ये मात्र भारतीय संघातील गौतम गंभीरचे नाव कर्णधार म्हणून टॅग केले होते. याशिवाय मनविंदर बिसला, सुनील नारायण, ब्रेट ली आणि ब्रेंडन मॅक्क्युलम यांचीही नावे टॅग केली होती.
टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज मनोज तिवारी याला मात्र ही गोष्ट रूचली नाही. त्याने ही सल लगेच बोलून दाखवली. माझ्यासह अनेक खेळाडूंच्या या विजेतेपदाबाबत अनेक आठवणी आहेत. पण हे ट्विट पाहून एक गोष्ट लक्षात येते की मला आणि शाकीब अल हसनला ट्विटमध्ये टॅग न करणं हा आमचा अपमान आहे. मी याबाबत दु:खी आहे, अशा शब्दात त्याने आपला संताप व्यक्त केला.
दरम्यान, कोलकाताकडून अंतिम सामन्यात बिसलाच्या ८९ धावांच्या खेळीव्यतिरिक्त जॅक कॅलीसने ६९ धावा केल्या होत्या. तर चेन्नईकडून सुरेश रैना (७३), माइक हसी (५४) आणि मुरली विजय (४२) यांनी अप्रतिम खेळी केल्या होत्या.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.