“…स्वतःच्या घरी तेच त्यांचं अखेरचं जेवण”, वडिलांच्या आठवणीत पंकजा मुंडे भावूक
गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीला गोपीनाथ गडावर गर्दी न करण्याचं पंकजा मुंडेंचं आवाहन
by लोकसत्ता ऑनलाइनभाजपाचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची ३ जून रोजी पुण्यतिथी असून गोपीनाथ गडावर त्यानिमित्ताने कार्यक्रम होणार आहे. पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरुन कार्यक्रम लाइव्ह होणार असून कोणीही गर्दी करु नये असं आवाहन केलं आहे. सोबतच पुण्यतिथीला गोपीनाथ मुंडे यांच्या आवडीचा पदार्थ करायचा आणि घरातच फोटोसमोर दोन दिवे लावून त्यांना अभिवादन करायचं असंही आवाहन केलं आहे. पंकजा मुंडे यांनी एक पोस्ट शेअर केली असून यामध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. ३ जून हा दिवस उजाडलाच नाही पाहिजे, असं वाटतं असंही त्या म्हणाल्या आहेत.
गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी संघर्ष दिन म्हणून साजरा केली जाते. यानिमित्ताने गोपीनाथ गडावर मोठ्या संख्येने मुंडे समर्थक जमतात. पण सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक तसंच राजकीय कार्यक्रमांवर बंदी आहे. यामुळे पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर साध्या पद्धतीने काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पुण्यतिथी कार्यक्रम होणार असल्याचं सांगितलं आहे. तसंच समर्थकांना दर्शन घेण्यासाठी किंवा मला भेटण्यासाठी गर्दी करु नका असं आवाहन केलं आहे.
काय लिहिलं आहे पोस्टमध्ये –
“३ जून” तसं मी या दिवसाची वाट अजिबात पाहत नाही. अगदी २ जून २०१४ ला जाऊन थांबावं असं वाटतं. २ जूनला आनंद, उत्साह, समाधान होतं. बाबा पोटभर रस पोळी खाऊन गेले होते. तेच अखेरचं जेवणं त्यांचं स्वत:च्या घरी….मग पार्थिवदेखील घऱी आणता आलं नाही…म्हणून ३ जून उजाडलाच नाही पाहिजे असं वाटतं.
तसं ३ जूनचा दिवस संघर्ष दिन म्हणून आपण साजरा करतो. गोपीनाथ गड माणसांनी तुडुंब भरलेला असता. पण यावेळी संघर्ष वेगळा आहे. सर्वांनी करोनामुळे काळजी आणि लॉकडाउनच्या नियमांचं पालन करायचं आहे, ही माझी विनंती आहे. यावर्षी कोणीही गर्दी करायची नाही. दर्शनासाठी नाही आणि मला भेटण्यासाठी देखील नाही.
३ जून रोजी नागरिकांनी आपापल्या घरात मुंडे साहेबांचा फोटो समोर उभे रहा. उजव्या बाजूला घरातील महिला, तर डाव्या बाजूला पुरुष उभे राहतील. दोन समई किंवा दिवे लावून अभिवादन करा. मुंडे साहेबांच्या आवडीचा पदार्थ करा, तो काय हे मी सांगायची गरज नाही. दुपारी १२ ते संध्याकाळी ६ या वेळेत अन्नदान, रक्तदान, मास्क किंवा औषधाचे वाटप करा, त्याचे फोटो माझ्या सोशल मीडियावर पाठवा.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.