https://images.loksatta.com/2020/03/Google.jpg?w=830

फेसबुकपाठोपाठ गुगलही भारतीय टेलिकॉम क्षेत्रात घेणार उडी?; ‘या’ कंपनीत करणार गुंतवणूक

गुगल या कंपनीतील ५ टक्के हिस्सा खरेदी करण्याची शक्यता

by

काही दिवसांपूर्वी फेसबुकनं रिलायन्स जिओमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आणखी काही कंपन्यांनीदेखील जिओमध्ये गुंतवणूक केली होती. आता गुगलनंदेखील भारतातील टेलिकॉम क्षेत्रात सर दाखवला आहे. एजीआरच्या ओझ्याखाली दबलेल्या व्होडाफोन आयडिया या कंपनीत गुगल गुंतवणूक करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गुगल ही कंपनी व्होडाफोन आयडिया या टेलिकॉम क्षेत्रातील कंपनीचा काही हिस्सा विकत घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फायनॅन्शिअल एक्स्प्रेसनं फायनॅन्शिअल टाईमधील अहवालाच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. गुगल व्होडाफोन आयडिया या कंपनीतील ५ टक्के हिस्सा खरेदी करण्याची शक्यता आहे. युनायटेड किंगडममधील व्होडाफोन आणि आदित्या बिर्ला यांच्या जॉइंट व्हेन्चर व्होडाफोन आयडिया या कंपनीतील ५ टक्के हिस्सा गुगल खरेदी करण्याची शक्यता असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेट ही जिओमध्ये गुंतवणूक करण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याचं निरनिराळ्या अहवालातून समोर आलं आहे.

काही दिवसांपूर्वीच दूरसंचार विभागानं व्होडाफोन आयडिया या कंपनीला एजीआरची ५८ हजार कोटी रूपयांची रक्कम भरण्याचे आदेश दिले होते. त्यापैकी कंपनीनं ६ हजार ८५४ कोटी रूपयांच्या रकमेचा भरणा केला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर बोलताना आदित्य बिर्ला यांनी सरकारकडून मदत न मिळाल्यास आम्हाला नाईलाजानं कंपनी बंद करावी लागेल, असं म्हटलं होतं. २०१८ मध्ये युकेतील व्होडाफोन आणि आदित्य बिर्ला समुहाची आयडिया या कंपन्या एकत्र आल्या होत्या. दोन्ही कंपन्यांच्या मर्जरनंतर व्होडाफोन आयडिया ही कंपनी तयार झाली. यामध्ये व्होडाफोनचा ४५ टक्के हिस्सा आहे.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.