गृहमंत्रालयाच्या पेजवर मद्याच्या बाटल्यांचे फोटो; अजब ‘मदतकार्या’ने सामान्य संभ्रमात
नेटकऱ्यांकडून टीका
by लोकसत्ता ऑनलाइनकाही दिवसांपूर्वी पश्चिम बंगाल आणि ओदिशामध्ये अम्फन या चक्रीवादळानं हाहाकार माजवला होता. या वादळाची तीव्रता इतकी होती की दोन्ही राज्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं होतं. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही राज्यांच्या दौरा करत मदतीची घोषणा केली होती. परंतु याच दरम्यान एका अधिकाऱ्याची एक चूक गृहमंत्रालयाला मोठी महागात पडली. एका कर्मचाऱ्यानं गृह मंत्रालयाच्या अधिकृत फेसबुक पेजवर पश्चिम बंगालमधील अम्फान चक्रीवादळादरम्यान करण्यात आलेल्या मदतीचे फोटो शेअर केले होते. यासोबतच त्या अधिकाऱ्यानं नजरचुकीनं अधिकृत फेसबुक पेजवर त्यासोबत मद्याच्या बाटल्यांचेही फोटो शेअर केले.
‘एनडीआरएफच्या टीमद्वारे पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यातील पांचला ब्लॉकमधील देउलपूर येथे काम सुरू आहे,’ या शीर्षकाखाली हे फोटो गृहमंत्रालयाच्या अधिकृत फेसबुक पेजवर अपलोड करण्यात आले होते. ‘फ्री प्रेस जर्नल’नं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. दरम्यान, गृहमंत्रालयाचं शोसल मीडिया हँडल हाताळणाऱ्या अधिकाऱ्याची ही चूक युझर्न त्वरित पकडली. या पोस्टमध्ये पश्चिम बंगालमधील मदतीच्या फोटोंसहित मद्याच्या बाटल्यांचे फोटोही शेअर करण्यात आले होतं. ही चूक लक्षात येताच गृहमंत्रालयाकडून ही पोस्ट डिलिट करण्यात आली. मोहम्मद झुबेर नावाच्या एका पत्रकारानं यासंबंधी एक पोस्ट शेअर केली होती.
यासंदर्भात पत्रकारनं नंतर पुन्हा एक पोस्ट शेअर केली. गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नकळत झालेली चूक असल्याचं त्यात नमूद करण्यात आलं होतं. गृहमंत्रालयाचं हे पेज हाताळणाऱ्या व्यक्तीनं कदाचित दोन्ही फोटो एकत्र शेअर केले. चूक समजल्यानंतर संबंधित व्यक्तीनं लेखी स्वरूपात माफीही मागितल्याचं या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, या प्रकरणावरून अनेक नेटकऱ्यांनी टीकादेखील केल्याचं पाहायला मिळालं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.