चिंताजनक! करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूसंख्येत भारताने चीनलाही टाकलं मागे
करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत नवव्या स्थानी
by लोकसत्ता ऑनलाइनदेशात करोनाबाधित रुग्णसंख्या गुरुवारी १ लाख ६५ हजारांवर पोहोचली असून करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत नवव्या स्थानावर पोहोचला आहे. चिंताजनक बाब म्हणजे करोनाबाधितांच्या मृत्यूसंख्येत भारताने चीनलाही मागे टाकलं आहे. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने दिलेल्या आकेडवारीनुसार, भारतात सध्या करोनाचे १ लाख ६५ हजार ३८६ रुग्ण आहेत. चीनच्या तुलनेत भारतात जवळपास दुप्पट करोनाबाधित रुग्ण आहेत. इतकंच नाही तर गुरुवारी भारतातील मृतांची संख्या ४७११ झाली असून चीनलाही मागे टाकलं आहे. चीनमध्ये ४६३४ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.
करोनाचा प्रसार चीनमधूनच होण्यास सुरुवात झाली होती. चीनमध्ये डिसेंबर महिन्यात करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. यानंतर जगभरात करोनाचा फैलाव झाला असून आतापर्यंत ५९ लाख लोकांना करोनाची लागण झाली आहे. तर साडे तीन लाखांहून अधिक लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. एकीकडे जगातील अनेक देशांमध्ये अद्यापही करोनाने थैमान घातलं असताना चीनमधील रुग्णसंख्या मात्र कमी होत असून गेल्या अनेक दिवसांत फार कमी प्रकरणं समोर आली आहे.
करोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला असून १७ लाख रुग्ण आहेत. करोनाबाधित रुग्णसंख्येत भारत नवव्या स्थानी असून भारताच्या आधी ब्राझिल, रशिया, इंग्लंड, स्पेन, इटली, फ्रान्स आणि जर्मनीचा क्रमांक आहे. चीन १४ व्या क्रमांकावर असून तुर्की, इराण आणि पेरु अनुक्रमे १०, ११ आणि १२ व्या क्रमांकावर आहेत.
मृत्यूंच्या संख्येतही अमेरिकाच पहिल्या क्रमांकावर असून आतापर्यंत १ लाखाहून अधिक करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर अनुक्रमे इंग्लंड, इटली, फ्रान्स, स्पेन, ब्राझिल, बेल्जिअम, मेक्सिको, जर्मनी आणि इराण पहिल्या १० देशांच्या यादीत आहेत. भारत मृत्यूसंख्येत १३ व्या स्थानी आहे. ११ आणि १२ व्या क्रमांवर कॅनडा आणि नेदरलँड आहेत.
भारतामध्ये करोनाच्या आतापर्यंत ३३ लाख चाचण्यात करण्यात आल्या आहेत. तुलनेत अमेरिकेत १.५ कोटी, रशियात ९७ लाख, जर्मनीत ४० लाख, इंग्लंडमध्ये ३८ लाख, इटलीत ३६ लाख आणि स्पेनमध्ये ३५ लाख कोव्हिड चाचण्या करण्यात आल्या आहेत. लोकसंख्येच्या तुलनेच चाचण्यांचं प्रमाणं पाहिलं जात तेव्हा तेव्हा भारत पहिल्या १०० देशांतही आढळत नाही अशी माहिती पीटीआयने दिली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.