शाळा दुरूस्ती करुन चाकरमान्यांचे विलगीकरण सत्कारणी
शाळेत शिकलेल्या काही माजी विद्यार्थ्यांचाही या चाकरमानींमध्ये समावेश आहे.
by लोकसत्ता टीमजिल्ह्य़ात मोठय़ा संख्येने आलेले चाकरमानी सध्या सर्वत्र चर्चेचा आणि काही ठिकाणी वादंगाचा विषय झाला असला तरी तालुक्यातील गोवळ येथे विलगीकरणाखाली असलेल्या चाकरमान्यांनी शाळेची स्वच्छता आणि छप्पर दुरुस्ती करून हा काळ सार्थकी लावला आहे. त्या शाळेत शिकलेल्या काही माजी विद्यार्थ्यांचाही या चाकरमानींमध्ये समावेश आहे.
मुंबईतून आलेल्या २३ लोकांना गोवळ येथील जिल्हा परिषद शाळा क्र. २ मध्ये ठेवण्यात आले आहे. त्यापैकी काहीजणांचा विलगीकरणाचा कालावधी येत्या दोन दिवसांत संपणार आहे, तर, काहींचा कालावधी काही दिवसांपूर्वी सुरू झाला आहे. ज्या शाळेने जीवन जगण्याचा मार्ग दाखविला त्या शाळेसाठी काहीतरी योगदान देण्याचा निर्धार या चाकरमान्यांनी केला असून शाळेच्या आवारामध्ये असलेल्या फुलझाडांना नियमित पाणी घालण्यासह परिसराची स्वच्छताही त्यांच्याकडून केली जात आहे. शाळेच्या इमारतीच्या छप्पराची दुरूस्तीही करणे गरजेचे होते. त्यामुळे ग्रामस्थांनी उपलब्ध करून दिलेल्या बांधकाम साहित्याच्या आधारे या चाकरमान्यांनी स्वयंस्फूर्तीने छप्पर दुरूस्तीही केली.
अशा प्रकारे विलगीकरणाचा कालावधी सत्कारणी लावत त्यांनी जोपासलेल्या या सामाजिक बांधिलकीबद्दल गावच्या सरपंच सुनंदा टेंबकर, ग्रामस्थ संजय जाधव, मुख्याध्यापक पारकर यांच्यासह गावातील ग्रामस्थांकडून या लोकांचे विशेष कौतुक केले जात आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.