https://images.loksatta.com/2020/05/covid-19-6.gif?w=830
संग्रहित छायाचित्र

सोलापुरात ८५ रुग्णांची भर; बाधितांची संख्या ७०९

ग्रामीण भागातही रुग्णसंख्येत वाढ

by

सोलापुरात गुरुवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत करोनाबाधित नवे ८५ रुग्ण आढळून आले. यामुळे एकूण रुग्णसंख्या ७०९ वर पोहोचली, तर चौघांच्या मृत्यूमुळे हा आकडाही ६७ झाला आहे. शहरासह ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे हा चिंतेचा विषय ठरला आहे.

काल बुधवारी सायंकाळी हाती आलेल्या माहितीनुसार करोनाबाधित नवे ४३ रुग्ण आढळून आले होते, तर तिघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गुरुवारी दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंत आणखी ४२ रुग्ण वाढले आणि एका मृताची भर पडली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ७०९ वर पोहोचली, तर मृतांचा आकडाही ६७ झाला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काल एकाच दिवशी दहा रुग्ण सापडले होते. त्यापाठोपाठ दुसऱ्या दिवशी आणखी सहा रुग्ण आढळून आले. त्यामुळे तेथील चिंता वाढली आहे.

आतापर्यंत सोलापूर शहरातच प्रामुख्याने करोना विषाणूने कहर केला असताना त्या तुलनेत ग्रामीण भागात करोनाचा फारसा शिरकाव झाला नव्हता. आतापर्यंत एकूण रुग्णसंख्येच्या केवळ दोन टक्के रुग्ण ग्रामीण भागात सापडले होते. परंतु आता त्यात वाढ  होत आहे. गुरुवारी सकाळपर्यंत एकूण रुग्णसंख्येच्या ४.२३ टक्के म्हणजे ३० रुग्ण ग्रामीण भागात सापडले आहेत. यात चार मृतांचा समावेश आहे. काल बुधवारी एकाच दिवशी पंढरपूर येथे पाच रुग्ण सापडले होते. तर अकलूज व अक्कलकोटमध्ये प्रत्येकी दोन रुग्ण आढळून आले होते. सोलापूरनजीक बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथे एक रुग्ण आढळून आला होता.बोरामणीत सापडलेला रुग्ण सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस शिपाई आहे. तो पाच दिवसांपासून बोरामणीत आई—वडिलांकडे राहात होता. नंतर आजारी पडून त्याला करोनाने बाधित केले. त्यानंतर दुसरम्य़ा दिवशी ग्रामीण भागात गुरुवारी नव्याने सहा रुग्ण आढळून आले. अक्कलकोट शहरात आणखी तीन रुग्ण सापडले आहेत. हे तिन्ही रुग्ण यापूर्वी मृत पावलेल्या एका करोनाबाधित व्यापाऱ्याच्या संपर्कात आले होते. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे गोदूताई परूळेकर विडी घरकुलात दोन रुग्ण आढळून आले. तर सांगोला तालुक्यातील निजामपूर येथेही एका रुग्णाचा शोध लागला. याशिवाय याच तालुक्यातील कडेबिसरी येथील एका व्यक्तीलाही करोनाबाधा झाली असून तिच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार होत आहेत. तथापि, एकीकडे रुग्णसंख्या वाढत असली तरी दुसरीकडे रुग्णालयात यशस्वी उपचाराद्वारे करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्याही ४४ टक्के म्हणजे ३११ इतकी झाली आहे. तर मृतांचे प्रमाण १० टक्के असून बहुतांश मृत वृद्ध आहेत.

रुग्णांचे नाते मुंबईशी

निजामपुरात आढळून आलेला रुग्ण गेल्या आठवडय़ात मुंबईहून गावी आला होता. नंतर त्यास ताप, खोकल्याचा त्रास सुरू असता त्याची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. यात त्याला करोनाने बाधित केल्याचे दिसून आले. यापूर्वी घेरडी येथील रुग्णदेखील मुंबईहूनच आला होता. पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे आढळून आलेला रुग्णदेखील मुंबईहून आला होता.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.