https://images.loksatta.com/2020/05/pal01-6.jpg?w=830

विक्रमगड तालुक्यात पाणीटंचाई

टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी

by

टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी

निखिल मेस्त्री, लोकसत्ता

पालघर : करोनाची झळ पालघर जिल्ह्याला बसत असतानाच पाणी टंचाई सदृश भीषण परिस्थितीलाही सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विक्रमगड तालुक्याला पाणीटंचाईची झळ बसली आहे. अनेक गावात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.   गावांमधून  टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी होत आहे.

विक्रमगड तालुक्यात दरवर्षी ३४ ते ३५ गावपाडयांना पाणीटंचाई सदृश्य स्थिती निर्माण होते. फेब्रुवारी ते मे पर्यंत अशी स्थिती राहते. यंदाही तशी स्थिती निर्माण झाली आहे. नदी, नाले, विहीरी, विंधन विहिरीच्या पाण्याची पातळी अगदीच खालावल्याने तसेच पर्यायी पाण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने टँकरने पाणीपुरठा करावा लागतो. उटावली ग्रामपंचायतीपैकी असलेला म्हसकरपाडयात पाणीटंचाई आहे. या पाडय़ात असलेल्या पाण्याचे स्रोत कोरडे पडल्याने परिणामी महिलांना  सुमारे चार किलोमीटरवर असलेल्या नदीवरून पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. अशीच परिस्थिती अनेक गावांत आहे.   गट विकास अधिकारींनी अजूनही टँकरचा प्रस्ताव तहसीलदार कार्यालयाकडे पाठविलेला नाही, यावरून प्रशासनाची उदासीनता स्पष्ट होत आहे.   तालुक्यातील पाणीटंचाईवर करोनामुळे अजूनही सर्वेक्षण झाले नसल्याचे समजते. असे असले तरी ज्या ठिकाणी टँकरची आवश्यकता भासणार आहे. त्या ठिकाणचे प्रस्ताव तात्काळ गट विकास अधिकारी यांनी तहसीलदार यांच्याकडे पाठवून पाणीटंचाईवर तोडगा काढुन येथील नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी यानिमित्ताने होत आहे. या परिस्थितीवर प्रशासकीय यंत्रणा काय करीत आहे यासाठी गट विकास अधिकारी यांच्याशी प्रतिक्रियेसाठी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता तो बंद होता.

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

विक्रमगड तालुक्यातील मतदार नागरिकांनी अनेक लोकप्रतिनिधी निवडून दिले आहेत. यापैकी एक आमदार येथील भागाचे नेतृत्व विधानसभेत करीत आहेत.तर काही जिल्हा परिषदेत मातब्बर पदाधिकारी आहेत. तालुक्यात टंचाई सदृश्य स्थिती निर्माण झाली असताना येथील नागरिकांच्या या समस्येकडे कानाडोळा करीत असून नागरिकांच्या पाणीटंचाई बाबत हे लोकप्रतिनिधी उदासीन आहेत, असे आरोप होत आहेत.

अजूनही पाणीटंचाई संदर्भात कोणताही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही. मात्र तरीही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पाणीटंचाई संदर्भात प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला जाईल, अशी कुठेही पाणीटंचाई उद्भवल्यास गटविकास अधिकारी यांचेमार्फत तात्काळ टँकरसाठीचे प्रस्ताव पाठवण्यास सांगणार असून तातडीने त्या ठिकाणी टँकर पुरविले जातील.

-जी.श्रीधर, तहसीलदार, विक्रमगड

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.