https://images.loksatta.com/2020/05/Untitled-18.jpg?w=830
गुरूपुष्य नक्षत्राच्या मुहुर्तावर पंजण खरेदीसाठी सांगलीत लागलेली रांग.

सांगलीच्या सराफ बाजारामध्ये हालचाल

‘गुरूपुष्य’च्या मुहुर्तावर ग्राहकांच्या रांगा

by

गेली अडीच महिने शांत असलेल्या सांगलीच्या सराफ बाजारामध्ये गुरूपुष्य नक्षत्राच्या मुहुर्तावर  गुरूवारी मोठी उलाढाल झाली. नागरिकांनी सोने-चांदी खरेदीसाठी रांगा लावल्या होत्या. सोने बाजारात आज तब्बल एक हजार रुपयांची घट झाली असून आजचा सोन्याचा दर प्रति दहा ग्रम ४७ हजार रुपये होता.

२२ मार्च रोजी करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अन्य बाजाराप्रमाणेच सराफ बाजारावरही निर्बंध आले होते. मात्र चौथ्या टप्प्यामध्ये शिथिलता मिळाली असली तरी ग्राहक वर्ग सराफी दुकानाकडे फारसा फिरकला नव्हता. चौथ्या टप्प्यामध्ये सराफी दुकानांना शिथिलता मिळाल्यानंतर सोन्याचा दर ४८ हजार रुपये तोळा होता. मात्र आज यामध्ये एक हजाराची घट होऊन आजचा दर ४७ हजार रुपये तोळा असल्याचे राज्य सराफ असोसिएशनचे उपाध्यक्ष किशोर पंडित यांनी सांगितले. तर चांदीचा दर किलोला ५० हजार रुपये झाला आहे.

टाळेबंदीत प्रथम चैतन्य

सोने खरेदीसाठी दसरा, दिवाळी पाडवा, गुढीपाडवा हे तीन संपूर्ण दिवस आणि अक्षयतृतीयेचा अर्धा दिवस असे साडेतीन मुहुर्त महत्त्वाचे मानले जातात. मात्र यंदाच्या हंगामातील गुढी पाडवा आणि अक्षयतृतीया हे दीड मुहुर्त टाळेबंदीत अडकल्याने सराफ बाजारात उलाढालच झाली नाही. लग्नाचे मुहुर्त असूनही जमावबंदीत  कार्य स्थगित करण्यात आली आहेत. तर काही  पुढे ढकलण्यात आली आहेत. यामुळे सराफ दुकाने ग्राहकांच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र कालपर्यंत होते. मात्र आजच्या गुरूपुष्य नक्षत्राच्या मुहुर्ताने पुन्हा सराफा बाजारात हालचाल वाढली आहे. सराफी दुकानामध्ये ‘साथ सोवळ्या’चे पालन करत खरेदीसाठी दुकानाबाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. टाळेबंदी लागू केल्यानंतर गुढी पाडवा आणि अक्षयतृतीया हे दोन मुहुर्त येऊन गेले मात्र त्यावेळी बाजार बंद असल्याने उलाढालच झाली नाही. आज ‘गुरूपुष्य’च्या मुहुर्तावर प्रथमच चैतन्य जाणवले.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.