क्षितिजावरचे वारे : ड्रॅगनच्या पाठीवर
अमेरिकेच्या भूमीवरून अमेरिकन अंतराळवीर अवकाशात पाठवण्याची मालिका पुन्हा सुरू होईल.
by लोकसत्ता टीमसौरभ करंदीकर
२०१२ साली स्पेस एक्सने प्रक्षेपित केलेले ‘ड्रॅगन’ नावाचं यान आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकापर्यंत जाऊन पोहोचणारं पहिलं खासगी अवकाशयान ठरलं. २०१४ मध्ये नासाने अंतराळवीरांना आयएसएसपर्यंत नेणारी अवकाशयानं निर्माण करायचं कंत्राट स्पेस-एक्स आणि बोईंग या कंपन्यांना बहाल केलं. तब्बल नऊ वर्षांच्या कालावधीनंतर या शनिवारी अमेरिकेच्या भूमीवरून अमेरिकन अंतराळवीर अवकाशात पाठवण्याची मालिका पुन्हा सुरू होईल.
काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपवर एक गमतीशीर फॉरवर्ड फिरत होता. फोटो होता आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाचा (इंटरनॅशनल स्पेस स्टेशन). या स्थानकातील एक अंतराळवीर गवाक्षातून सभोवार पसरलेल्या पृथ्वीकडे चिंतातुर नजरेने पाहात आहे, असा तो फोटो होता. आणि त्या फोटोखाली वाक्य होतं — ‘कदाचित कोव्हिड-१९ पासून आता हीच एक जागा सुरक्षित असावी’. करोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला आहे, पण जगापासून दूर सुमारे चारशे किलोमीटर उंचीवर फिरणाऱ्या या प्रयोगशाळेवर अजून तरी त्याचं सावट पडलेलं नाही! संकटाच्या काळात सुचलेला हा निव्वळ विनोद असला तरी अवकाशातील मानवाचं वास्तव्य वरवर वाटतं तितकं बिनधोक अजिबात नाही. अंतराळाची अनंत पोकळी आणि स्टेशनमध्ये वावरणारे अंतराळवीर यांच्यात धातू आणि इतर पदार्थानी बनलेलं फक्त काही इंचांचं कवच असतं. आपला जीव धोक्यात घालून गेली सुमारे २१ वर्ष विविध देशांतील आणि विविध वर्णाच्या अंतराळ-चमूंनी स्पेस स्टेशनवर वास्तव्य केलं आहे. १९९० साली या स्टेशनचा पहिला भाग, ‘झर्या’ रशियाने प्रक्षेपित केला. दोन आठवडय़ांनी अमेरिकेने आपला ‘युनिटी’ नावाचा भाग प्रक्षेपित करून ‘झर्या’शी जोडला. दोन वर्षांनंतर रशियाने आणखी एक भाग जुळवला. त्यापाठोपाठ युरोपियन स्पेस एजन्सी, जपान आणि कॅनडा यांनीही आपापले भाग जुळवले आणि अभूतपूर्व सहकार्याने निर्माण झालेलं स्पेस स्टेशन क्रमाक्रमाने कार्यरत झालं. स्पेस स्टेशनमध्ये वास्तव्य करणारा पहिला चमू २००० साली तिथे पोहोचला, त्या क्षणापासून स्टेशनवर विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध प्रयोगांना सुरुवात झाली, ती मालिका आजही चालूच आहे.
‘इंटरनॅशनल स्पेस स्टेशन’ म्हणजेच आयएसएसचं कार्य तीन प्रकारचं आहे. पहिलं शास्त्रीय संशोधन करणं, दुसरं पृथ्वीचं आणि सभोवतालच्या अंतराळाचं निरीक्षण आणि सर्वेक्षण करत राहाणं आणि तिसरं भविष्यातील मानवाच्या चंद्र, मंगळ आणि इतर मोहिमांना त्यांचा ‘पहिला टप्पा‘ म्हणून आश्रय देणं.
‘पृथ्वीवर इतकी आव्हानं असताना हव्यात कशाला या अवकाश सहली?’ अशी टीका आतापर्यंत अनेकांनी केली. अमेरिकेची अपोलो मोहीम तसंच स्पेस शटल मोहीम राजकारण आणि अर्थकारण यांचा बळी ठरली. अतोनात खर्चाचं कारण देत २०१० साली अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी नासाची २०२० मधली चंद्र-मोहीम रद्द झाल्याची घोषणा केली. २०११ साली स्पेस शटल कार्यक्रमातील शेवटचं उड्डाण पार पडलं. अपघात, बिघाड यांच्यापेक्षा जनमतानं या मोहिमांचा खऱ्या अर्थानं शेवट केला. विरोधकांच्या घोषणांमध्ये शास्त्रीय प्रयोगांची मालिका खुंटली याची अनेकांना जाणीव नव्हती. मात्र आयएसएसवर अशा प्रयोगांची मालिका सुरूच राहिली. पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, वनस्पतीशास्त्र या शाखांमधील गुरुत्वाकर्षण-रहित संशोधन स्पेस स्टेशनवर घडतं. कॅन्सर, पार्किन्सन्स या व्याधींवर नवीन औषधं शोधणं या कार्यातही आयएसएसचा मोलाचा वाटा आहे. आजच्या घडीला औषधं आणि लसी यांच्या मानवी चाचण्या खुद्द माणसांवर न करता समान गुणधर्म आणि प्रतिसाद देणाऱ्या चिपवर करण्याचं तंत्रज्ञान नावारूपाला येत आहे. अशा चाचण्यादेखील स्पेस स्टेशनवर करायची सोय आहे. काही चतुर उद्योजकांनी याच स्पेस स्टेशनच्या साहाय्याने ग्राहकोपयोगी तंत्रज्ञानावरचे प्रयोगदेखील घडवून आणले आहेत. काही महिन्यांपूर्वी एका शॉवर उत्पादकाने पाण्याचा कमीत कमी वापर व्हावा असं नवीन डिझाइन तयार केलं होतं. पाण्याच्या थेंबांचा मारा या नवीन डिझाइनच्या शॉवरमधून कसा होतोय? डिझाइनमध्ये काय बदल केले तर शॉवर अधिक उपयुक्त ठरेल? हे पाहण्यासाठी त्या उद्योजकाने चक्क आयएसएसला गळ घातली! शून्य गुरुत्वाकर्षणात पाण्याच्या तुषारांचं अधिक अचूक निरीक्षण करता येईल, या उद्देशाने तो शॉवर आज स्पेस स्टेशनवरच्या प्रयोगांच्या क्रमवारीत आपला ‘नंबर’ लावून आहे!
अमेरिकेने स्वत:चा अंतराळ कार्यक्रम रद्द केला तरी त्यांनी रशियन स्पेस एजन्सीच्या साहाय्याने (तिकिटाची भली मोठी रक्कम देऊन) आपल्या अंतराळवीरांना आयएसएसवर पाठवणं सुरूच ठेवलं. सामानाची ने-आण करण्यासाठी त्यांनी इलॉन मस्क या उद्योजकाने नावारूपाला आणलेल्या स्पेस-एक्स या कंपनीची मदत घेतली. २०१२ साली स्पेस एक्सने प्रक्षेपित केलेले ‘ड्रॅगन’ नावाचं यान आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकापर्यंत जाऊन पोहोचणारं पहिलं खासगी अवकाशयान ठरलं. २०१४ मध्ये नासाने अंतराळवीरांना आयएसएसपर्यंत नेणारी अवकाशयानं निर्माण करायचं कंत्राट स्पेस-एक्स आणि बोईंग या कंपन्यांना बहाल केलं. तब्बल नऊ वर्षांच्या कालावधीनंतर या शनिवारी अमेरिकेच्या भूमीवरून अमेरिकन अंतराळवीर अवकाशात पाठवण्याची मालिका पुन्हा सुरू होईल. स्पेस-एक्स आणि नासा यांच्या सहकार्याने ‘क्रू ड्रॅगन डेमो २’ या यानाचं प्रक्षेपण करण्यात येणार आहे. हे यान अवकाशात नेण्याचं काम स्पेस-एक्सने विकसित केलेल्या ‘फाल्कन-९’ या अग्निबाणावर सोपवण्यात आलं आहे.
बॉब बेनकेन आणि डग हर्ले हे अमेरिकेचे अंतराळवीर ‘क्रू ड्रॅगन डेमो २’ मधून आयएसएसच्या दिशेने प्रवास करतील. या अंतराळवीरांचं प्रशिक्षण २००० साली सुरू झालं होतं. दोघेही आतापर्यंत दोनदा अंतराळ प्रवास करून आलेले आहेत. परंतु ते ज्या यानांमधून गेले त्यात आणि ‘क्रू ड्रॅगन’मध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. अंतराळयान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ती शेकडो बटणं, खटके, अनंत प्रकारचे आकडे दर्शवणाऱ्या लहान-मोठय़ा तबकडय़ा, हॅण्डल्स आणि फिरक्या. या साऱ्यांना ड्रॅगनच्या डिझाइनमध्ये थारा नाही. ड्रॅगन कॅप्सूलमध्ये हे काहीच नाही! आहेत त्या अंतराळवीरांच्या सीटच्या वर लटकवलेल्या तीन टच स्क्रिन्स. खरं सांगायचं तर अंतराळवीरांना इथे करण्यासारखं फारसं काहीच नाहीये. सगळं काम कॉम्प्युटर करणार आहे. अगदी त्यांचा स्पेस सूटदेखील साधा सरळ, पूर्वीप्रमाणे अवघडून टाकणारा नाहीये. या साऱ्या गोष्टी, सारी डिझाइन्स एखाद्या विज्ञान-कथेवर आधारित चित्रपटासारखी भासत आहेत.
इलॉन मस्क यांचा उद्देशदेखील सामान्य माणसांना भविष्यात अंतराळ प्रवास घडवणे हाच आहे. त्यांची व्यावसायिक गणितं यावरच आधारित आहेत. देव करो आणि करोनाचा नायनाट होवो, परंतु भविष्यात याहूनही अधिक भयंकर संकटांचा सामना करावा लागला आणि उद्या मंगळावर वस्ती करण्याची पाळी आली, तर त्याचाही पुरता विचार इलॉन मस्क आणि स्पेस-एक्सने केलेला आहे. आतापर्यंत ‘क्रू ड्रॅगन’मध्ये प्रवास करणाऱ्या अंतराळवीरांची अनेकदा करोना टेस्ट झालेली आहे. सुमारे वीस आठवडे या दोघांनी आणि त्यांच्या साहाय्यक कर्मचाऱ्यांनी, आयसोलेशनमध्ये काढलेले आहेत. थोडक्यात, व्हॉट्सअॅपवर फिरणारा तो विनोद अजून तरी खराच मानायला हरकत नाही.
viva@expressindia.com
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.