https://images.loksatta.com/2020/05/zodiac-sign.jpg?w=830

राशिभविष्य : दि. २९ मे ते ४ जून २०२०

चंद्र-शुक्राच्या केंद्र योगामुळे नव्या कल्पना, संकल्पना यांवर विचार कराल. योजनांची आखणी कराल.

by

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष चंद्र-शुक्राच्या केंद्र योगामुळे नव्या कल्पना, संकल्पना यांवर विचार कराल. योजनांची आखणी कराल. मनाची चंचलता वाढू देऊ नका. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या मदतीने परिस्थितीतून सावराल.  मित्र आणि शेजारी यांच्याकडून मिळालेल्या साहाय्यामुळे धीर मिळेल. जोडीदार आपल्या कार्यक्षेत्रात निगुतीने काम करेल. कुटुंबाचा आíथक भार उचलेल. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवण्याचा दोघेही प्रयत्न कराल. आरोग्यात सुधारणा होईल.

वृषभ बुध-शनीच्या षडाष्टक योगामुळे अनेक अडथळे पार करून पुढे जावे लागेल. नित्याच्या गोष्टींच्या व्यवस्थापनात अडचणी येतील. नोकरी-व्यवसायात काम धिम्या गतीने पुढे जाईल. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती कराल. सहकारी वर्गाचे विशेष साहाय्य मिळेल. जोडीदाराची साथ चांगली मिळेल. त्याच्या कार्यक्षेत्रात त्याचे वर्चस्व वाढेल. कौतुकास पात्र ठरेल. कौटुंबिक वातावरण हळूहळू निवळेल. आरोग्याची काळजी घेतल्यास भीतीचे कारण नाही.

मिथुन चंद्र-शनीच्या केंद्र योगामुळे अडचणींवर मात करण्याचे नवे मार्ग शोधाल. नोकरी-व्यवसायात मेहनत घेऊन पुढे जायचा प्रयत्न कराल. अपेक्षित लाभ मिळण्यास विलंब होईल. सहकारी वर्ग आपणास मदत करून त्यांची क्षमता सिद्ध करेल. जोडीदाराच्या समस्या समजून घ्याल. कौटुंबिक वातावरण हसते-खेळते ठेवाल. ज्येष्ठांचा आरोग्याची काळजी घ्याल. आपणास उत्सर्जन संस्था आणि उष्णतेचे विकार त्रास देण्याची शक्यता आहे.

कर्क चंद्र-शुक्राच्या नवपंचम योगामुळे प्रेम, माया, ममता यांचे महत्त्व समजून घ्याल. आपल्या आवडीनिवडी आणि छंद जोपासाल.  नोकरी-व्यवसायात काही निर्णय अचानक बदलावे लागतील. जास्त चिकित्सा न करता सर्वाच्या हिताचा निर्णय अंतिम ठरवाल. सहकारी वर्गाकडून अपेक्षित साहाय्य मिळेल. जोडीदाराच्या साथीने कठीण परिस्थितीवर मात कराल. कुटुंबाकडून आधार मिळेल. हाड मोडणे वा सांधे आखडणे यांसारखे त्रास सहन करावे लागतील.

सिंह चंद्र-बुधाच्या लाभ योगामुळे सद्य:स्थितीकडे व्यावहारिक दृष्टीने पाहाल. हतबल न होता संकटातही संधी शोधाल. नोकरी-व्यवसायात  सहकारी वर्गाकडून चांगल्या प्रकारे कामे करून घ्याल. जातीने त्यांच्या समस्या समजून घ्याल. जोडीदाराची योग्य साथ मिळेल. आरोग्य क्षेत्रात त्याचे भरीव योगदान असेल. कौटुंबिक वातावरण उत्साही ठेवण्याचा प्रयत्न कराल. पाठीचा मणका आणि सांधेदुखीचा त्रास सहन करावा लागेल. कोवळ्या उन्हात बसावे.

कन्या गुरू-चंद्राच्या नवपंचम योगामुळे नवे तंत्रज्ञान विकसित कराल किंवा आत्मसात कराल. आरोग्यविषयक संशोधनात साहाय्य कराल. नोकरी-व्यवसायात मोठय़ांच्या ओळखीने कामाला गती येईल. सहकारी वर्गाकडून चांगली मदत मिळेल. उत्तम व्यवस्थापन कराल. जोडीदाराच्या नव्या संकल्पनांचे कौतुक होईल. कुटुंब सदस्यांच्या चिंता समजून घ्याल. आणि त्या दूर करण्याचा प्रयत्न यशस्वी कराल. व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे थकवा जाणवेल.

तूळ चंद्र-प्लुटोच्या नवपंचम योगामुळे समाजहिताच्या गोष्टीत सहभागी व्हाल. जमावाला दिलासा द्याल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे आदेश तंतोतंत पाळाल. सहकारी वर्गाच्या अडचणी व्यवस्थापकांसमोर निर्भीडपणे मांडाल. जोडीदाराला भावनिक आधाराची गरज भासेल. कुटुंबात आपले मार्गदर्शन मोलाचे ठरेल. घरातील वातावरण संमिश्र राहील. गुडघे दुखतील. पोटऱ्यांमध्ये गोळे येतील. अशक्तपणावर मात करणे आवश्यक! रोगप्रतिकारक शक्ती वाढवा.

वृश्चिक चंद्र-मंगळाच्या समसप्तम योगामुळे आरोग्य चांगले राहील. रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वाची पावले उचलाल. सहकारी वर्गाच्या कामात सरकारी नियमांमुळे विलंब होईल. धिराने घ्यावे लागेल. रागावर संयम ठेवा. जोडीदाराची साथ चांगली मिळेल. सद्य:परिस्थितीतही कलात्मकतेला उत्तेजन देऊन सामाजिक कार्यात सहभागी होईल. कौटुंबिक वातावरणातील ताणतणाव कमी कराल.

धनू चंद्र-हर्षलच्या नवपंचम योगामुळे उच्च पदावरील अधिकाराचा योग्य उपयोग कराल. नोकरी-व्यवसायात बुद्धिमत्तेला पोषक वातावरण मिळेल. संशोधनाच्या कार्यक्षेत्रात प्रगतिकारक वाटचाल कराल. आरोग्यविषयक सेवांमध्ये मोलाची कामगिरी पार पाडाल. सहकारी वर्गाची समयसूचकता कामी येईल. जोडीदाराला कायद्याची बंधने पाळावी लागतील. परिस्थितीचा स्वीकार करणे कुटुंबाच्या हिताचे ठरेल. घरातील ज्येष्ठांच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी.

मकर चंद्र-शनीच्या नवपंचम योगामुळे चंद्राचे नावीन्य आणि शनीची जिद्द व चिकाटी यांचा योग्य समन्वय होईल. नोकरी-व्यवसायातील सद्य:परिस्थितीचा आव्हान म्हणून स्वीकार कराल. सहकारी वर्गालाही कामाची उमेद द्याल. जोडीदाराच्या विचारांचा आदर कराल. कर्तव्य आणि व्यवहार यांसह भावनांनादेखील महत्त्व द्याल. कौटुंबिक कलह विसरून एकमेकांना मदत कराल. कोरडय़ा त्वचेचे विकार बळावतील. उष्णतेमुळे फोड, पुटकुळ्या यांचा त्रास होईल.

कुंभ रवी-शुक्राच्या युतीयोगामुळे रवीच्या कर्तृत्वाला शुक्राच्या कलात्मकतेची चांगली जोड मिळेल. नोकरी-व्यवसायात नव्या संकल्पना मांडाल. वरिष्ठांचा विश्वास जिंकाल. सहकारी वर्गाकडून फारशा अपेक्षा न ठेवणे बरे! जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात जोखमीचे काम शिताफीने करेल. त्याचे कौतुक आणि अभिमानही वाटेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. मुलांच्या अडचणींवर उपाय शोधाल. ओटीपोट दुखणे, पचन बिघडणे असे त्रास संभवतात.

मीन रवी-चंद्राच्या नवपंचम योगामुळे हाती घेतलेल्या कामांना गती मिळेल. भरपूर प्रयत्न आणि मेहनतीने प्रगतिपथावर वाटचाल कराल. वरिष्ठांचा सल्ला मार्गदर्शक ठरेल. सहकारी वर्गाला धीर द्याल. स्वत: मनाने खंबीर राहाल. जोडीदाराकडून आíथक व भावनिक भक्कम आधार मिळेल. कौटुंबिक वातावरणात ताण जाणवेल. उष्णतेमुळे डोळ्यांना त्रास होईल. वेळेवर काळजी घ्यावी लागेल.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.