https://images.loksatta.com/2020/05/pun07-2.jpg?w=830

खर्चिक वर्तुळाकार मार्गावर फुली

निधीच्या कमतरतेमुळे महापालिकेचा निर्णय

by

निधीच्या कमतरतेमुळे महापालिकेचा निर्णय

पुणे : शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गाची कामे सुरू करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून गती दिली जात असतानाच आर्थिक पेच लक्षात घेऊन महापालिके कडून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर तूर्त फुली मारण्यात आली आहे. या मार्गाची कामे करण्यासाठी अंदाजपत्रकात १७६ कोटी रुपयांची तरतूद असून सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता हा निधी देणे महापालिके ला शक्यच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे किमान वर्षभर तरी वर्तुळाकार मार्गाची कामे लांबणीवर पडणार असल्याचे दिसून आले आहे.

शहर आणि उपनगरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकर मार्ग (एचसीएमटीआर) प्रस्तावित आहे. सर्व उपनगरे, सर्वाधिक वाहतूक असलेले शहरातील ६० छोटे-मोठे रस्ते आणि पिंपरी-चिंचवड महाापलिकेच्या काही प्रमुख रस्त्यांना जोडणारा हा प्रस्तावित मार्ग ३६ किलोमीटर लांबीचा आणि २४ मीटर रुंदीचा आहे. दोन्ही बाजूला प्रत्येकी तीन याप्रमाणे सहा मार्गिका असतील. या मार्गावर बीआरटीसाठी दोन स्वतंत्र मार्गिका असून उर्वरित चार मार्गिका खासगी वाहनांसाठी खुल्या ठेवल्या जाणार आहेत.

महापालिके तील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडीनेही या मार्गाच्या आराखडय़ात बदल करून त्याला गती देण्याचा निर्णय घेतला होता.  वर्तुळाकार  मार्गाच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्यानंतर ती ४५ टक्के  चढय़ा दराने आली होती. त्यामुळे हा खर्च ७ हजार ५३५ कोटींवर पोहोचला होता. महापालिके च्या अंदाजपत्रकाएवढा हा खर्च  याशिवाय   राज्य शासनाने निधी देण्याची झटकलेली जबाबदारी, राजकीय अडचणी,  सध्याची बिकट होत असलेली आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन या प्रकल्पाच्या कामांना तूर्त हात न लावण्याचा निर्णय महापालिके ने घेतला आहे.

वर्तुळाकार मार्गासाठी सहा हजार कोटींचा खर्च येणार असला तरी हा खर्च एकदम होणार नाही. कामे जसजशी पुढे सरकतील तसतसा टप्प्याटप्प्याने हा खर्च होणार आहे. त्यादृष्टीने अंदाजपत्रकात अनुषंगिक कामांसाठी १७० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पण एकदम हा निधी खर्च करणे सद्य:स्थितीत महापालिके ला अडचणीचे ठरणार आहे. वाहतुकीच्या पायाभूत सुविधेच्या दृष्टीने हा प्रकल्प उपयुक्त ठरणार असला तरी निधी देणे महापालिके च्या आवाक्याबाहेरच आहे.

असा आहे वर्तुळाकार मार्ग

खडकी, औंध, शिवाजीनगर, एरंडवणे, कोथरूड, मुंढवा, कल्याणीनगर, येरवडा आणि कळस या भागातून हा रस्ता प्रस्तावित आहे. ३६.६ किलोमीटर लांबीचा हा रस्ता उन्नत (एलेव्हेटेड) स्वरूपाचा आहे. रस्त्याची रुंदी २४ मीटर असून एकू ण सहा मार्गिका आहेत. काही मार्गिका बीआरटी मार्गासाठी राखीव आहेत. हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाना जोडला जाणार असून बीआरटीची २८ स्थानके  प्रस्तावित आहेत. पादचाऱ्यांसाठी यांत्रिकी जिन्याची सुविधा असून चाळीस वर्षांतील वाहतुकीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन या मार्गाला चालना देण्यात येत आहे.

कात्रज-कोंढवा रस्ताही अधांतरी

कात्रज-कोंढवा बाह्य़वळण रस्त्याच्या दुतर्फ  लोकवस्ती झाल्यामुळे अपघात आणि सातत्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या त्यासाठीची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या मार्गासाठी २४५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च करणे महापालिके ला अडचणीचे ठरत आहे. भूसंपादनावेळीही रोख मोबदला मागितला जात आहे. त्यामुळे सध्या या रस्त्याचे भवितव्यही अधांतरीच आहे.

वर्तुळाकार मार्गासाठीचा निधी कसा उभारायचा हा प्रश्न आहे. प्राधान्यक्रमाचा विचार करता हा मार्ग तातडीने पूर्ण करणे हिताचे ठरणार नाही. कात्रज-कोंढवा रस्त्याचीही जिथे शक्य आहेत, तेथील कामे सुरू ठेवण्यात येतील. सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता मोठा खर्च करता येणे शक्य नाही.

शेखर गायकवाड, आयुक्त, महापालिका

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.