https://images.loksatta.com/2020/05/Untitled-24.jpg?w=830
संग्रहित छायाचित्र

मुंबईत अफवांचीच ‘टोळधाड’

समाजमाध्यमांवरील छायाचित्रे बनावट

by

उपनगरात गुरुवारी दुपारपासून टोळधाडीच्या चित्रफिती आणि छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्या, परंतु ती अफवाच असल्याचे स्पष्ट झाले. टोळधाड इशारा संस्था आणि राज्याच्या कृषी विभागाने मुंबईत टोळधाड ही निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट केले.

टोळधाड बुधवारी राज्यात विदर्भातील काही जिल्ह्य़ांमध्ये येऊन गेल्याचे राज्याच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘टोळधाड बुधवारी रात्री भंडारा जिल्ह्य़ातील तुमसर या ठिकाणी होती. गुरुवारी सकाळी १० ते १२ च्या सुमारास ही टोळधाड मध्य प्रदेशात गेली असल्याचे, राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी सांगितले. कृषी विभागाचे कर्मचारी टोळीधाडीच्या मागावर असून तिच्या निर्मूलनासाठी आवश्यक काळजी घेत असल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबईला टोळधाडीबाबत कोणताही इशारा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टोळधाड इशारा केंद्र ही संस्था टोळधाडीच्या मार्गाची संपूर्ण नोंद ठेवते. राज्यात टोळधाड केवळ विदर्भापर्यंतच मर्यादित राहिल्याचे या संस्थेने स्पष्ट केले. ‘मुंबईतील टोळधाड ही केवळ अफवा असल्याचे या संस्थचे उप संचालक के. एल. गुर्जर यांनी स्पष्ट केले. टोळधाड सध्या मध्य प्रदेशमध्ये असून वाऱ्यांची दिशा पाहता मुंबईकडे टोळधाड येण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र दुपारपासूनच समाजमाध्यमांवर या संदर्भातील चित्रफिती आणि छायाचित्रे मोठय़ा प्रमाणात फिरू लागल्या. जयपूर, उदयपूर येथील छायाचित्रे मुलुंड, विक्रोळी, गोरगाव भागातील म्हणून अग्रेषित झाली. घराचे दरवाजे, खिडक्या बंद करून घ्यावेत अशा स्वरूपाच्या इशाऱ्यांमुळे नाहक भीती आणि तणाव निर्माण झाला. काही जणांनी खिडकीबाहेरील एखाद्या-दुसऱ्या किटकाची छायाचित्रे प्रसारित करून शहरात टोळधाड आल्याचे संदेश पाठवले होते. एकीकडे करोना आणि टाळेबंदीचा तणाव असताना त्यांत या अफवेची भर पडली.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.