https://images.loksatta.com/2020/05/cyber-1.jpg?w=830
(संग्रहित छायाचित्र)

सायबर सेलच्या ‘डिफॉल्टर’ची माया जमवण्यासाठी धडपड

काम करणाऱ्यांविरुद्ध तक्रार करण्याची खोड

by

काम करणाऱ्यांविरुद्ध तक्रार करण्याची खोड

मंगेश राऊत, लोकसत्ता

नागपूर : टाळेबंदीमुळे ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत असतानाच उपराजधानीतील सायबर सेलकडून तपासाची गती वाढली आहे. पण, या कामांसोबत सायबर सेलमध्ये माया जमवण्यासाठी काहींमध्ये वाद सुरू झाला असून एका डिफॉल्टर कर्मचारी काम करणाऱ्यांची वरिष्ठांकडे तक्रार करीत असल्याने गेल्या काही दिवसांपासून सायबर सेलमध्ये अंतर्गत तक्रारींच्या चौकशीचा ससेमिरा सुरू झाला आहे.

पोलीस कर्मचारी व अधिकारी भ्रष्ट असतात, असे आरोप अनेकदा होत असतात. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अनेक अधिकारी व कर्मचारीही अडकले आहेत.

माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात सायबर गुन्ह्य़ांमध्ये वाढ होत असून तपासालाही चालना मिळत आहे. वाढत्या प्रकरणांसह सायबर सेललाही भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. वरिष्ठांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. काही महिन्यांपूर्वी पैशाची मागणी केल्यावरून एका पोलीस शिपायाला डिफॉल्टर ठरवण्यात आले व त्याच्याकडून काम काढून घेण्यात आले. या कर्मचाऱ्याला सायबरमध्ये पाच ते सहा वर्षे झाली असून तो अनेक विषयांत तज्ज्ञ आहे. सध्याच्या परिस्थितीत खासगी तज्ज्ञांची मदत घेण्यात असून त्याच्याकडे काम नाही. खासगी तज्ज्ञालाही सायबरमधील अर्थपूर्ण व्यवहार लक्षात आले. त्याच्याकडून अनेक तक्रारींचा निपटारा करण्यात येत होता. त्याला अधिक माया मिळत असून आपल्याकडे कोणतेच काम नाही, अशी भावना झाल्याने त्याने खासगी तज्ज्ञाची वरिष्ठांकडे तक्रार केली. या प्रकरणाची चौकशी झाली असता खासगी तज्ज्ञाची सेवा खंडित करण्यात आली.  सायबर सेलमध्ये केवळ माया जमवण्यासाठी हा खटाटोप सुरू असल्याचे आता स्पष्ट होत आहे. सायबर सेलमधील एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर ही माहिती दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून  भ्रष्टाचाराची किड संपवावी, अशी मागणी काही कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

वैमनस्याचे डावपेच

तक्रार करणारा पोलीस शिपाई सायबर सेलमधील सर्वात जुन्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा साथीदार आहे. काही प्रकरणांत त्यांच्यात मतभेद निर्माण झाले. त्यानंतर सहाय्यक निरीक्षकांनी वरिष्ठांच्या मदतीने संबंधित कर्मचाऱ्याचा काटा काढला. आता तो कर्मचारी सायबर सेलला डोईजड होत असल्याची माहिती आहे.

बदली नियम यांना लागू नाही का?

बदलीसाठी कर्मचाऱ्यांना एकाच ठिकाणी पाच वर्षे  आणि अधिकाऱ्यांसाठी दोन वर्षे सेवेची अट आहे. सायबर सेलमध्ये काम करणारा वादग्रस्त कर्मचारी व त्याचा जुना सहकारी अधिकारी हे ५ वर्षांपासून काम करीत आहेत. पण, त्यांची बदली करण्यात आलेली नाही. त्यांना पोलीस ठाण्यात काम करायची इच्छा नाही. त्यांना बदली नियम यांना लागू नाही का, असा सवाल उपस्थित करून यामागचे कारण शोधले जावे, असाही एक सूर येथे व्यक्त होत आहे.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.