बुद्धिबळातील नवप्रवाहाचा वेध
‘लोकसत्ता सहज बोलता..बोलता’मध्ये आज ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे
by लोकसत्ता टीमउच्चविद्याविभूषित आणि समोर करिअरच्या अनेक संधी असूनही निव्वळ बुद्धिबळावरील प्रेमाखातर प्रवीण ठिपसे या खेळाकडे वळले. संगणकाधारित प्रशिक्षणाच्या कोणत्याही सोईसुविधा नसताना निव्वळ इच्छाशक्ती, बुद्धिबळाची आस आणि अपार मेहनत या त्रिसूत्रीच्या जोरावर भारताचे तिसरे आणि महाराष्ट्राचे पहिले बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनले. या मनस्वी आणि हरहुन्नरी बुद्धिबळपटूशी आणि विश्लेषकाशी संवाद साधण्याची संधी ‘लोकसत्ता सहज बोलता..बोलता’च्या निमित्ताने आज, शुक्रवारी बुद्धिबळप्रेमी आणि वाचकांना मिळत आहे.
विश्वनाथन आनंद हा भारताचा एकमेव बुद्धिबळ जगज्जेता. त्याचा वारसदार बनण्याची क्षमता कोणत्या विद्यमान भारतीय खेळाडूमध्ये आहे, याबाबत ठिपसे यांचे विचार ऐकणे ही पर्वणी ठरेल. या उपक्रमाचे सहप्रायोजक ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी’ असून, आज सायंकाळी पाच वाजता तो आयोजित करण्यात आला आहे.
करोनामुळे इतर सर्वच खेळ बंद असताना, बुद्धिबळाच्या अनेक ऑनलाइन स्पर्धा अव्याहत सुरू आहेत. ऑनलाइन स्वरूपामुळे मोठय़ा प्रमाणावर तरुणाई या खेळाकडे आकर्षित होत आहे. भारतात हा खेळ आज लोकप्रिय झाला याचे श्रेय विश्वनाथन आनंद, प्रवीण ठिपसे, दिव्येंदु बारुआ अशा आद्य ग्रँडमास्टरांनाही जाते. गेल्या तीन दशकांमध्ये या खेळात झालेल्या विविध बदलांचा आणि व्यक्तिमत्त्वांचा धांडोळा या वेबसंवादात घेतला जाईल.
वाचकांनी या संवादात सहभागी होण्यासाठी https://tiny.cc/LS-SahajBoltaBolta-29May या लिंकवर जाऊन नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी https://www. loksatta.com या संकेतस्थळाला भेट द्या.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.