https://images.loksatta.com/2020/05/nag01-11.jpg?w=830

नागपुरातील कारागिरांच्या गणेश मूर्ती यंदा विदेशात जाणार नाहीत

करोनाच्या प्रादुर्भावामुळे लाखोंचे नुकसान होणार

by

करोनाच्या प्रादुर्भावामुळे लाखोंचे नुकसान होणार, महाराष्ट्र मंडळे आणि मराठी नागरिकांना हुरहुर

नागपूर : अमेरिकेसह विविध देशांमध्ये तेथील महाराष्ट्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सव साजरा होतो. त्यासाठी नागपुरातून गणपतीच्या मूर्ती पाठवल्या जातात. मात्र यावेळी सर्वत्र करोनाच्या प्रादुर्भाव असल्यामुळे  नागपुरातून एकही मूर्ती व मूर्तिकारांना तेथे जाणे शक्य नाही. त्यामुळे यावेळी विदेशांमध्ये महाराष्ट्रीयन लोकांना गणपती मूर्ती मिळणे कठीण होणार आहे.

अमेरिकेमध्ये ६५ महाराष्ट्र मंडळ असून त्यातील अनेक मंडळांकडे व मराठी नागरिकांकडे महाराष्ट्रातून गणपतीची मूर्ती जात असते.  नागपुरातील चितार ओळीत सूर्यवंशी, इंगळे, बंड आणि ताजणेकर या मूर्तिकारांकडील मूर्ती एक ते दीड महिनाआधी अमेरिकेला जातात. शिवाय नागपुरात राहणारे मूर्तिकार रमेश कोलुरवार यांचा मुलगा न्यूयार्कला राहत असून ते गणेशोत्सवाच्या निमित्ताने सहा महिन्यांआधी मुलांकडे जाऊन राहतात आणि त्या ठिकाणी गणपतीच्या मूर्ती तयार करत असतात.

यावेळी ते मार्चच्या शेवटच्या आठवडय़ात जाणार होते. मात्र  सर्वत्र टाळेबंदी असल्यामुळे आणि तेथे मोठय़ा प्रमाणात करोना बाधिताची संख्या असल्यामुळे ते गेले नाही.

कोलुरवार यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले, तेथील महाराष्ट्र मंडळात मी केलेली मूर्ती स्थापन केली जाते. यावेळी मात्र खूप अडचणी आहेत.

चितार ओळीत जवळपास २२ मूर्ती अमेरिका, जर्मनी, आणि लंडनला जात असतात. मात्र यावेळी त्यांच्याकडून  निरोप आला नसल्याचे प्रमोद सूर्यवंशी यांनी सांगितले.

सध्या करोनाचे सावट असले तरी  चितार ओळीतील गणेशमूर्ती घडवणारे कारागीर आपल्या मूर्ती घडवण्याच्या कामाला लागले आहे. मूर्तीसाठी लागणारी माती त्यांना मिळत नसल्यामुळे मोठय़ा मूर्ती घडवणे सध्या कठीण झाले आहे.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.