टोळधाड आली आणि परतून गेली..
राज्यात कोणतेही कृषिसंकट नसल्याचा तज्ज्ञांचा निर्वाळा
by लोकसत्ता टीमगेल्या काही दिवसांपासून करोनाने आधीच भयग्रस्त असलेल्या देशासमोर टोळधाडीमुळे निर्माण होणारे कृषिसंकट उभे राहिले आहे. सध्या टोळधाड राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तरप्रदेश राज्यात आणि विदर्भातील काही भागावर आली आहे. मात्र ही टोळधाड विदर्भातील जास्त तापमान असलेला भाग वगळता राज्यात अन्यत्र येणार नाही असे तज्ज्ञांचे मत आहे.
दरम्यान, विदर्भात वेळीच औषध फवारणीची उपाययोजना केल्यामुळे निम्मी टोळधाड गारद झाली आणि उरलेली पुन्हा मध्य प्रदेशात परतल्याचे कृषी खात्याकडून सांगण्यात आले. यामुळे राज्यातील कृषीसंकट टळले आहे. पाकिस्तानच्या सीमेलगत असणाऱ्या राजस्थानवर टोळधाड अधूनमधून येत असते, पण १९९३ मध्ये जेवढा प्रदेश तिने व्याप्त केला होता, त्यापेक्षा अधिक भाग या टोळधाडीने या वेळी व्यापला आहे. ही टोळधाड १० किलोमीटर लांब व दोन किलोमीटर रुंद होती. ताशी १२ ते १६ किलोमीटर इतक्या वेगाने उडत होती.राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यपीठाने वाळवंटी टोळ व त्यांचे नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना सुचविली आहे. त्यानुसार राज्यभर दक्षता घेतली जात आहे.
येण्याचे कारण..
टोळधाड ही खादाड व नुकसान करणारी कीड आहे. ती मोठय़ा प्रमाणात पिकाचे व इतर वनस्पतीचे व झाडाझुडपांचे नुकसान करते. वाळवंटी टोळ या बहुभक्षी किडय़ाचे शास्त्रीय नाव ‘स्किस्टोसेर्का ग्रीगेरिया’ हे आहे. एका दिवसात टोळ त्यांच्या वजनाएवढे अन्न खात असते. २०१९मध्ये आफ्रि केत जास्त पाऊ स पडल्याने इराण, पाकिस्तानमार्गे टोळांचे थवे प्रजननासाठी देशात आले असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
मुंबईत अफवांचे पीक.. मुंबई : मुंबईत गुरुवारी दुपारपासून टोळधाडीच्या चित्रफिती आणि छायाचित्रे समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्या असल्या तरी अखेरीस ती अफवाच असल्याचे स्पष्ट झाले. टोळधाड इशारा संस्था आणि राज्याच्या कृषी विभागाने मुंबईतील टोळधाड ही अफवा असल्याचे सांगितले. गुरुवारी सकाळी १० ते १२ च्या सुमारास टोळधाड मध्य प्रदेशात परतल्याचे, राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी सांगितले.
टोळधाड केवळ झाडे व पिकावर येते. घरावर येत नाही. माणसाला काही उपद्रव होत नाही. उत्तर, दक्षिण व पश्चिम महाराष्ट्र,मराठवाडा कोकण तसेच मुंबई व पुणे या भागाला टोळधाडीचा धोका नाही. टोळधाड कधीही या भागात आलेली नाही. सध्या फक्त विदर्भात ती असून केवळ एका चांगल्या पावसाने त्या नष्ट होतील.
डॉ. अशोक वाळूंज, कीड रोग शास्त्रज्ञ, महात्मा
फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.