राजभवनात काटकसरीचा निर्णय
देशविदेशातील पाहुण्यांच्या स्वागताच्या वेळी दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू तसेच स्मृतिचिन्हांवरही बंदी
by लोकसत्ता टीमकरोना संकाटामुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा आर्थिक ताण लक्षात घेऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनाच्या खर्चात कपात करण्याचे आदेश दिले आहेत. राजभवनासाठी नवीन गाडीचा प्रस्ताव पुढे ढकलताना राजभवानावर येणाऱ्या देशविदेशातील पाहुण्यांच्या स्वागताच्या वेळी दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू तसेच स्मृतिचिन्हांवरही बंदी घालण्यात आली आहे.
राजभवनसाठी स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा असावी, असा राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविल्याबद्दल राज्यपालांवर टीका होत असतानाच राज्यपालांनी स्वत:हून काटकसरीचा निर्णय घेतला आहे. दोन महिन्यांपासून टाळेबंदी सुरू असल्याने सर्व उद्योग, व्यवहार ठप्प आहेत. त्यातच करोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांवर सरकारला कोटय़वधी रुपये खर्च करावे लागत आहेत. राज्यावर कोसळलेल्या या आर्थिक संकटाच्या काळात सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे नागरिकही आर्थिक मदत करत आहेत. सरकरनेही काटकसरीचे धोरण स्वीकारत विकासकामांवरही निर्बंध आणले आहेत.
राजभवनाच्या चालू आर्थिक वर्षांच्या खर्चात विविध उपाययोजनांद्वारे १० ते १५ टक्के कपात करण्याच्या सूचना राज्यपाल कोश्यारी यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. राजभवनात कोणतेही नवे मोठे बांधकाम सुरू करण्यास मज्जाव करण्यात आला असून केवळ प्रगतिपथावर असलेली चालू कामेच पूर्ण करावीत. पुढील आदेशांपर्यंत राजभवन येथे येणाऱ्या देशविदेशातील पाहुण्यांना स्वागताच्या वेळी भेटवस्तू वा स्मृतिचिन्हे देऊ नयेत. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या स्वागताच्या वेळी पुष्पगुच्छ देण्याची प्रथा बंद करण्यात यावी. राजभवन येथील अतिमहत्त्वाच्या अतिथी कक्षांमध्ये ‘फ्लॉवर पॉट’ तसेच शोभिवंत फुलदाणी ठेवू नयेत असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच स्वातंत्र्य दिनाच्या संध्येला १५ ऑगस्ट रोजी पुणे येथील राजभवन येथे राज्यपाल आयोजित करीत असलेला स्वागत समारंभ यंदा रद्द करण्याचा निर्णयही राज्यपालांनी घेतला आहे.
राजभवनातील नोकर भरतीवर बंदी घालण्यात आली असून नवी गाडी खरेदीचा प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला आहे. तसेच कुलगुरू व अधिकाऱ्यांसोबतच्या बैठका दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून घेऊन प्रवास खर्चात बचत करण्यात यावी अशीही सूचना राज्यपालांनी के ली आहे. काटकसरीच्या या उपाययोजनांमुळे वाचणारा निधी तुलनेने कमी असला तरीही करोना संकटाशी मुकाबला करण्याच्या दृष्टीने तो महत्त्वपूर्ण ठरेल, असे मत राज्यपालांनी व्यक्त केले आहे.
उपाययोजना
* नवीन गाडी खरेदीचा प्रस्ताव लांबणीवर
* देशी-विदेशी पाहुण्यांना भेटवस्तू नाही
* स्वागताच्या वेळी पुष्पगुच्छ देण्याची प्रथा बंद
* अतिथी कक्षांमध्ये ‘फ्लॉवर पॉट’ ठेवण्यास बंदी
* पुणे राजभवनातील १५ ऑगस्टचा स्वागत समारंभ रद्द
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.