https://images.loksatta.com/2020/05/corona-1.gif?w=830
संग्रहित छायाचित्र

अंत्यविधीनंतर मृत महिला करोनाबाधित असल्याचे निष्पन्न

सोलापुरातील धक्कादायक प्रकार

by

सोलापुरात करोना विषाणूचा प्रसार झपाटय़ाने होत असल्यामुळे सार्वत्रिक चिंतेचे वातावरण निर्माण झाले असतानाच एका धक्कादायक प्रकारामुळे एका मृत वृध्द महिलेच्या नातेवाईकांसह शेजारच्या मंडळींची झोप उडाली आहे. कारण अंत्यविधी उरकल्यानंतर त्या मृत वृध्द महिला करोनाबाधित असल्याचे समोर आले.

शहरातील कर्णिकनगरात राहणाऱ्या एका ७५ वर्षांच्या वृध्द महिलेला १२ दिवसांपूर्वी मधुमेहाचा त्रास वाढल्यामुळे एका नामांकित रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यन, तिची करोना संबंधित वैद्यकीय चाचणी घेण्यात आली होती. चाचणी अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच त्या महिलेचा काल बुधवारी दुपारी मृत्यू झाला. रुग्णालयाच्या प्रशासनाने मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आणि नंतर नातेवाईक, शेजारची मंडळींनी अक्कलकोट रोड हिंदू स्मशानभूमीत मृत वृध्द महिलेचा अंत्यविधी उरकला.

तथापि, गुरुवारी, दुसऱ्या दिवशी या मृत वृध्द महिला करोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आणि प्रशासनाची धावपळ सुरू झाली. मृत महिलेच्या कुटुंबीय व नातेवाईकांसह शेजारच्या मंडळींना प्रचंड धक्का बसला. मृत महिलेच्या संपर्कात आलेल्या १६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. आणखी काही व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे.

रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत वृध्द महिलेची करोनाशी संबंधित चाचणी घेण्यात आली होती. चाचणी अहवाल प्राप्त होण्यापूर्वी ती महिला मरण पावली तरी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात कसा दिला, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. मृताच्या नातेवाईकांनी याबद्दल संताप व्यक्त केला आहे.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.