बुलडाणा जिल्ह्यातील आणखी दोघांना करोनाची लागण
जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ५०; शेगाव येथील एका रुग्णाला सुट्टी
by लोकसत्ता ऑनलाइनलोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : बुलडाणा जिल्ह्यातील आणखी दोन जणांना करोना तपासणी अहवाल बुधवारी सकारात्मक आला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ५० झाली आहे. दरम्यान, शेगाव येथील एका रुग्णाला सुट्टी देण्यात आली.
बुलडाणा जिल्ह्यातील नमुने तपासणीसाठी अकोला येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी ३७ नमुन्यांचे अहवाल आज प्राप्त झाले. त्यामध्ये ३५ अहवाल नकारात्मक, दोन अहवाल सकारात्मक आले आहेत. सकारात्मक अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये दे.राजा तालुक्यातील निमखेड येथील २२ वर्षीय तरुण आणि मलकापूर येथील ३८ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. निमखेड येथील तरुणाचा मुंबई प्रवास, तर मलकापूर येथील रुग्णाचा अकोला येथील प्रवासाचा इतिहास आहे.
दरम्यान, शेगाव येथील एका महिला रुग्णामध्ये मागील दहा दिवसांपासून करोनाचे कुठलेही लक्षणे नसल्यामुळे रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५० करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २८ जणांना उपचाराअंती रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. सध्या रुग्णालयामध्ये १९ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आणखी ६४ नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १०१५ जणांचे अहवाल नकारात्मक आले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी. पुरी यांनी दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.