
सोलापूर : दिवसभरात ४३ नवे करोनाबाधित, तिघांचा मृत्यू
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही करोनाचा प्रादुर्भाव
by एजाजहुसेन मुजावरसोलापुरात आज बुधवारी सायंकाळी हाती आलेल्या माहितीनुसार करोनाबाधित नवे ४३ रूग्ण आढळून आले. तर तिघांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रूग्णसंख्या ६६७ वर पोहोचली तर मृतांचा आकडाही ६६ झाला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज एकाच दिवशी दहा रूग्ण सापडल्यामुळे तेथील चिंता वाढली आहे.
आतापर्यंत सोलापूर शहरातच प्रामुख्याने करोनाचा कहर दिसत होता. तर त्या तुलनेत ग्रामीण भागात करोनाचा फारसा शिरकाव झालेला नव्हता. आतापर्यंत एकूण रूग्ण संख्येच्या दोन टक्के इतकेच रूग्ण ग्रामीण भागात सापडले होते. परंतु आता त्यात वाढ होत आहे. आज एकाच दिवशी पंढरपूर येथे पाच रूग्ण सापडले. तर अकलूज व अक्कलकोटमध्ये प्रत्येकी दोन रूग्ण आढळून आले. सोलापूरनजीक बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथे एक रूग्ण आढळून आला. बोरामणीत सापडलेला रूग्ण सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस शिपाई आहे. तो पाच दिवसांपासून बोरामणीत आई-वडिलांकडे राहात होता. नंतर आजारी पडल्याने त्याला करोनाचे बाधी झाल्याचे स्पष्ट झाले. आज नव्याने आढळून आलेल्या दहा रूग्णांसह ग्रामीण भागातील रूग्णसंख्या २४ झाली आहे. यात चार मृतांचा समावेश आहे.
एकीकडे रूग्णसंख्या वाढत असली तरी दुसरीकडे रूग्णालयात यशस्वी उपचाराद्वारे करोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्याही ४६ टक्के म्हणजे ३११ इतकी झाली आहे. सध्या रूग्णालयात २९० रूग्णांवर उपचार होत आहेत. मृतांचे प्रमाण १० टक्के असून बहुतांशी मृत वृध्द आहेत.
 लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.