बदलापुरात आणखी १३ जणांना करोनाची लागण, रुग्णसंख्येत सातत्याने वाढ
अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत जाणाऱ्यांना करोनाची लागण होत असल्याचं निष्पन्न
by लोकसत्ता ऑनलाइनठाणे जिल्ह्यातील महत्वाचं शहर म्हणून ओळख असलेल्या बदलापुरात आज १३ जणांना करोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शहरात करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे स्थानिक प्रशासनासमोर चिंतेचं वातावरण तयार झालेलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे बदलापूर शहरातील अनेक नागरिक अत्यावश्यक सेवेसाठी दररोज मुंबईला ये-जा करत आहेत. या प्रवासादरम्यान त्यांना करोनाची लागण होत असल्याचं समोर येतंय. केल्या काही दिवसांत करोना बाधित रुग्णांमध्ये मुंबईत ये-जा करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचं आढळून आलं आहे.
याव्यतिरीक्त याआधी करोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे अहवालही पॉजिटीव्ह येत आहेत. बुधवारी लागण झालेल्या १३ जणांपैकी ७ जणं हे करोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेले असून उर्वरित ६ जणं हे मुंबईत अत्यावश्यक सेवेत कामाला जाणारे व्यक्ती आहेत. आतापर्यंत बदलापूर शहराची रुग्णसंख्या १९२ पर्यंत पोहचलेली असून अजुन १३ जणांचे अहवाल येणं बाकी असल्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शहरात आतापर्यंत ७ रुग्णांनी करोनाशी लढताना आपले प्राण गमावले आहेत, तर ८५ नागरिक उपचार घेऊन बरे झाल्यानंतर घरी परतले आहेत. बदलापुरातील करोनाग्रस्त रुग्णांवर बदलापूर, उल्हासनगर, ठाणे, भाईंदर, मुंबई यासारख्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शहरातील ६० रहिवासी संकुल प्रतिबंधित केली आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.