दारु पिण्यासाठी महापौरानेच तोडला लॉकडाउनचा नियम; पोलिसांपासून वाचण्यासाठी शवपेटीत झोपला
शवपेटीमध्ये झोपलेल्या महापौराचा फोटो झाला व्हायरल
by लोकसत्ता ऑनलाइनपेरु देशामधील एका शहरातील महापौरानेच सरकारने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनदरम्यान घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केले. हा महापौर नियम मोडून आपल्या घराबाहेर पडला. मात्र पोलिसांना पाहताच आपल्यावर कारवाई होऊ नये म्हणून या व्यक्तीने चक्क शवपेटीमध्ये उडी मारत मृत असल्याचा अभिनय केल्याचे समजते. यासंदर्भातील वृत्त इव्हिनिंग स्टॅडर्ट या वेबसाईटने दिलं आहे.
या महापौराचे नाव जॅमी रोनाल्डो उर्बीना टॉरेस असं आहे. इंटरनेटवर सध्या शवपेटीमध्ये झोपलेल्या जॅमी यांचा फोटो चर्चेचा विषय ठरत आहे. अनेकांनी ट्विटवरुन तो शेअर केला आहे. या महापौराने आपल्या मित्रांबरोबर मद्यप्राशन करण्यासाठी लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केलं. या गोष्टीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस या लोकांवर कारवाई करण्यासाठी गेले असताना जॅमीने शवपेटीत झोपला तर त्याचे मित्र कपाटामागे लपवले. तंतारा शहरामधील हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महापौरावर सर्व स्तरातून टीका होताना दिसत आहे.
स्थानिक प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी जॅमी आणि त्याच्या मित्रांना नंतर ताब्यात घेतलं आहे. सध्या शहरामध्ये महापौरांच्या या कारनाम्याचीच चर्चा आहे. आधीच करोनाची साथ पसरलेली असताना महापौरांच्या कामाबद्दल तंतारावासीयांची नाराजी होती त्यातच आता या प्रकरणामुळे महापौरांविरोधात तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे. करोनाची साथ पसरल्यापासून जॅमी केवळ आठ दिवस शहरामध्ये होते असं सांगण्यात येत आहे. या कालावधीमध्ये शहरांमधील बेघरांसाठी महापौरांनी काहीच केलं नसल्याचा आरोप स्थानिक करत आहेत.
दक्षिण अमेरिकेमधील पेरुमध्ये करोनाने थैमान घातलं असून येते बुधवारपर्यंत (२७ मेपर्यंत ) एक लाख २९ हजारहून अधिक करोनाग्रस्त रुग्ण अढळून आले आहेत. तर तीन हजार ७०० हून अधिक जणांना करोनामुळे मृत्यू झाला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.