हरभजननंतर कैफची माजी प्रशिक्षक चॅपेल यांच्यावर टीका
भारताची संस्कृती समजण्यास असमर्थ ठरल्याचे मांडले मत
by लोकसत्ता ऑनलाइन१९९९ च्या विश्वचषक स्पर्धेत भारताला फारसं यश मिळालं नाही. त्यानंतर माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन, अष्टपैलू रॉबिन सिंग, फलंदाज अजय जडेजा असे काही मोठे खेळाडू मॅच फिक्सिंगमध्ये अडकले. त्यानंतर भारताने युवा खेळाडूंची फौज उभी करत आक्रमक सौरव गांगुलीला कर्णधारपद दिले. त्याचसोबत २००० साली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पहिल्यांदा परदेशी प्रशिक्षकाची नेमणूक केली. २००० ते २००५ या कालावधीत जॉन राईट यांनी भारतीय संघाला यशस्वी कामगिरी करून दाखवण्याची जिद्द दिली. पण त्यानंतर प्रशिक्षक म्हणून आलेल्या ग्रेग चॅपल यांची कारकीर्द तितकी यशस्वी ठरू शकली नाही. या दोघांमध्ये नेमका काय फरक होता? याबद्दल भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफ याने मत व्यक्त केले.
“चॅपल हे एक उत्तम फलंदाजी प्रशिक्षक होऊ शकले असते, पण त्यांना ते जमलं नाही. त्यांना संघातील खेळाडूंशी नीट संवाद साधता आला नाही. त्यांनी स्वतःच स्वतःची प्रतिमा मलीन केली. कारण त्यांना भारतीय संस्कृती नीट समजूच शकली नाही. याउलट जॉन राईट मात्र चांगले प्रशिक्षक होते. संघातील प्रत्येक खेळाडूला ते सहकार्य करायचे. आणि महत्वाचे म्हणजे त्यांनी गांगुलीला कर्णधार म्हणून विविध निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले. त्यामुळे संघ अनेक स्पर्धेत चांगली कामगिरी करू शकला”, असे कैफने स्पष्ट केले.
हरभजन सिंग, सचिन तेंडुलकर आणि ग्रेग चॅपल
हरभजनने केली होती टीका
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला फटकेबाज फलंदाजपासून ते संयमी मॅच-फिनिशर बनवण्यात चॅपेल यांचाच वाटा होता, असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. यावरून फिरकीपटू हरभजन सिंग याने त्यांच्यावर सडकून टीका केली होती. “धोनीला मैदानालगतचे फटके खेळण्याचा सल्ला चॅपल यांनी या कारणासाठी दिला, कारण त्यावेळी ते इतरांना मैदानाबाहेर उडण्याच्या प्रयत्नात होते. त्या काळात चॅपल यांचे काही निराळेच खेळ (संघातील राजकारण) सुरू होते. ग्रेग (चॅपल) यांच्या काळात भारतीय क्रिकेटने सर्वात घाणेरडे दिवस पाहिले”, असे ट्विट करत हरभजनने चॅपल यांना खडे बोल सुनावले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.