कर्नाटकातील धार्मिक स्थळं १ जूनपासून खुली होणार?; येडियुरप्पांनी मागितली पंतप्रधानांकडे परवानगी
मंदिर, मशीद, चर्च आणि इतर धार्मिक स्थळ खुली करण्यासाठी पाठवलं पत्र
by लोकसत्ता ऑनलाइनकरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. सोशल डिस्टसिंग राखलं जावे म्हणून धार्मिक स्थळेही बंद करण्यात आली होती. देशात लॉकडाउन लागू होऊन आता दोन महिने झाले आहेत. सरकारनं लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात अनेक बाबींना शिथिलता दिली असून, कर्नाटक सरकारनं धार्मिक स्थळ खुली करण्यासाठी पंतप्रधानांकडे परवानगी मागितली आहे. केंद्राकडून मंजूरी मिळाल्यास कर्नाटकात १ जूनपासून धार्मिक स्थळ खुली होणार आहेत.
लॉकडाउनचा चौथा टप्पा संपल्यानंतर कर्नाटकात धार्मिळ स्थळे खुली करण्याची तयारी येडियुरप्पा सरकारनं सुरू केली आहे. मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलं आहे. कर्नाटकातील मंदिर, मशीद, चर्च आणि इतर धार्मिक स्थळ खुली करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे. “धार्मिक स्थळं खुली करण्यापूर्वी आम्हाला इतर परवानग्या घ्याव्या लागणार आहे. त्यामुळे काय होतंय बघू. जर केंद्र सरकारकडून परवानगी मिळाली, तर १ जूनपासून धार्मिक स्थळे उघडू शकतील,” असं मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी बुधवारी सांगितलं.
देशात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारनं लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर करोनाचा प्रसार नियंत्रणात येत नसल्यानं सरकारनं तीन वेळा लॉकडाउनचा कालावधी वाढवला. सध्या देशात लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू आहे. चौथ्या टप्प्यात केंद्र सरकारनं अनेक सेवा सुरू करण्यास मुभा दिली. विशेषतः विमान वाहतूक सुरू न करण्याचा निर्णय सुरूवातीला घेण्यात आला होता. मात्र, नंतर निर्णय बदल मर्यादित स्वरूपात विमान वाहतुकही सुरू करण्यात आली आहे. चौथा लॉकडाउन संपायला चार दिवस शिल्लक आहेत. मात्र, अनेक ठिकाणी परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे पाचव्या टप्प्यात लॉकडाउन वाढवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारची मागणी मान्य करण्याची शक्यताही कमी आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.