https://images.loksatta.com/2020/05/Snake.jpg?w=830

क्वारंटाइन सेंटरमध्ये ६ वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू

खाटा उपलब्ध नसल्यामुळे जमिनीवर झोपला होता परिवार

by

देशभरात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. बाहेरुन प्रवास करुन आलेल्या लोकांना खबरदारीचा उपाय म्हणून शासकीय यंत्रणा क्वारंटाइन सेंटरमध्ये हलवत आहेत. मात्र देशातील काही भागांमध्ये क्वारंटाइन सेंटरमध्येही पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याची बाब समोर आली होती. नैनितालमध्ये सहा वर्षीय मुलीला क्वारंटाइन सेंटरमध्ये सर्पदंशामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे. सहा वर्षीय मुलगी काही दिवसांपूर्वी उत्तराखंडमधील बेतालघाट भागातून नैनितालला आली होती. खबरदारीचा उपाय म्हणून या परिवाराला अधिकाऱ्यांनी क्वारंटाइन सेंटरमध्ये हलवलं.

नैनितालपासून काही किलोमिटर अंतरावर असलेल्या शासकीय महाविद्यालयात क्वारंटाइन सेंटर उभारण्यात आलेलं आहे. मात्र इकडे मुलभूत सोयी-सुविधांचा अभाव असल्याचं समोर आलं होतं. या सेंटरमध्ये पुरेशा खाटा उपलब्ध नसल्याने या परिवाराला अधिकाऱ्यांनी जमिनीवर झोपायला सांगितलं. यावेळी रात्री झोपेत, सहा वर्षीय मुलीला सर्पदंशामुळे आपले प्राण गमवावे लागले. जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेची दखल घेतली असून घडलेला प्रकार दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. या क्वारंटाइन सेंटरचा सर्वे करुन सोयी-सुविधांबद्दलचा अहवाल पाठवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक ग्रामपंचायत व अधिकाऱ्यांना दिले आहेत. शासनातर्फे या परिवाराला ३ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.