इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्याचा मार्ग मोकळा, रद्द झालेल्या पेपरचे ‘इतके’ गुण मिळणार
लॉकडाउनमुळं रद्द झाला होता दहावीचा भूगोल विषयाचा पेपर
by लोकसत्ता ऑनलाइनमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. दहावीच्या सामाजिक शास्त्रे पेपर-2 (भूगोल) व दिव्यांग कार्यशिक्षण या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या विषयांच्या गुणदानासंदर्भात शिक्षण मंडळाने पर्याय शोधला आहे. त्यासंदर्भात शिक्षण मंडळाने प्रत्रक काढले आहे.
या विषयांच्या परिक्षेसाठी गुणदान करून निकाल जाहीर केले जाणार असल्याचे, राज्यमंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळवले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2020 माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षा दि. मार्च 2020 ते 23 मार्च 2020 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. मात्र राज्यात करोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सोमवार 23 मार्च 2020 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत आयोजित करण्यात आलेली सामाजिक शास्त्रे पेपर-2 (भूगोल) या विषयाची लेखी परीक्षा आणि त्यानंतर आयोजित करण्यात आलेली दिव्यांग विद्यार्थांच्या कार्यशिक्षण या विषयांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. या परीक्षा रद्द केलेल्या विषयांना पुढीलप्रमाणे गुणदान करण्यात येणार आहे.
सामाजिक शास्त्रे पेपेर-2(भूगोल) या विषयाचे गुणदान हे उमेदवाराने दिलेल्या अन्य विषयांच्या लेखी परीक्षेस पात्र केलेल्या गुणांची सरासरी विचारात घेवून, त्याचे रुपांतर परीक्षा रद्द केलेल्या भूगोल विषयाच्या परीक्षेसाठी निर्धारित केलेल्या गुणांमध्ये करण्यात येणार आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण या विषयाचे गुणदान त्याने अऩ्य विषयांच्या लेखी,तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत मूल्यमापन/तत्सम परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांची सरासरी विचारात घेवून, त्याचे रूपांतर परीक्षा रद्द केलेल्या कार्यशिक्षण विषयाच्या परीक्षेसाठी निर्धारित केलेल्या गुणांमध्ये करण्यात येणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.