महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती ‘ऑल इज वेल’-नाना पटोले
महाराष्ट्रात राजकीय संकट नाही
by लोकसत्ता ऑनलाइनमहाराष्ट्रात राजकीय आणबाणी किंवा संकट अशी काहीही परिस्थिती नाही असं विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीत सारं काही आलबेल नाही अशा चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये रंगल्या होत्या. मात्र महाराष्ट्रात अशी कोणतीही परिस्थिती नाही असं आता नाना पटोले यांनी म्हटलं आहे. तसंच महाराष्ट्रात राजकीय परिस्थिती सरकारच्या विरोधात जाईल अशीही कोणती शक्यता नाही असंही पटोले यांनी ANI शी बोलताना सांगितलं आहे.
“महाराष्ट्रात प्रसारमाध्यमांमध्ये राज्यातली परिस्थिती सरकारच्या विरोधात जाईल. सरकार अस्थिर होईल अशा प्रकाराच्या काही बातम्या आल्या होत्या.मात्र अशी कोणतीही परिस्थिती महाराष्ट्रात नाही. महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती पूर्णतः स्थिर आहे. महाराष्ट्रात आम्ही सध्या करोना नावाच्या संकटाशी लढतो आहोत. आज मी दिल्लीत आलोय कारण केंद्र सरकारकडून करोनावर उपाय योजण्यासंबंधीचे निर्देश घ्यायचे आहेत” असंही पटोले यांनी स्पष्ट केलं.
माजी मुख्यमंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. महाराष्ट्र सरकार करोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलं आहे असं त्यांनी राज्यपालांना सांगितलं. तसंच मुंबईतली रुग्णालयं लष्कराच्या ताब्यात द्यावीत आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केली होती. त्यामुळे महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती डळमळीत झाल्याच्या काही बातम्या चालल्या. मात्र अशी कोणतीही परिस्थिती महाराष्ट्रात नाही असं आज नाना पटोले यांनी सांगितलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.