https://images.loksatta.com/2020/05/Uddhav-Rahul-1.jpg?w=830
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. (संग्रहित छायाचित्र)

‘त्या’ वक्तव्यानंतर राहुल गांधी यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन; म्हणाले…

उद्धव ठाकरेंनीही मांडली भूमिका

by

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील सरकारविषयी पक्षाची भूमिका मांडली होती. त्यांच्या वक्तव्यानंतर राज्यात वेगवेगळे तर्कविर्तक लावले जात होते. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसवर टीका केली होती. काँग्रसेच्या भूमिकेबद्दल शंका उपस्थित केली जात असतानाच राहुल गांधी यांनी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून संवाद साधला.

काँग्रेस नेते राहुल गांधी पत्रकार परिषदेत बोलत असताना “महाराष्ट्रातील सरकारला आमचा पाठिंबा आहे. मात्र, मोठे निर्णय घेण्याचे अधिकार नाही. ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, तिथे आम्ही निर्णय घेऊ शकतो. मात्र, केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मदत मिळायला हवी,” असं म्हटलं होतं. आधीच राज्यात राजकीय अस्थिरतेच्या चर्चा सुरू असताना केलेल्या या विधानामुळे राजकीय गप्पांना रंग चढला होता. विरोधकांनीही काँग्रेसवर टीका केली होती.

राज्यात सुरू झालेल्या चर्चांनंतर राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोन करून संवाद साधला. “शिवसेना आणि काँग्रेसमधील मैत्री कायम आहे. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या संकटाच्या काळात काँग्रेस प्रत्येक निर्णयात सरकारसोबत आहे,” अशी ग्वाही राहुल गांधी यांनी ठाकरे यांना दिली. तर “सरकारमध्ये काँग्रेसचा सन्मान ठेवला जाईल. सरकारच्या निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला सहभागी करून घेण्याचीच भूमिका आहे,” असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना दिलं.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला तिन्ही पक्षातील मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेही उपस्थित राहणार आहे.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.