https://images.loksatta.com/2020/05/Dog.jpg?w=830
(Photo: twitter/thandojo)

Coronavirus: …म्हणून ‘हा’ कुत्रा मागील तीन महिन्यापासून रुग्णालयात आहे बसून

फेब्रुवारीपासून हा कुत्रा रुग्णालयाच्या लॉबीमध्येच आहे

by

शहरांपासून गावांपर्यंत सगळीकडेच दिसणारा पाळीव प्राणी म्हणजे कुत्रा. कुत्रे त्यांच्या मलकावर अगदी जीव ओवाळून टाकतात असं सांगितलं जातं. अनेकदा मालकाचा मृत्यू झाल्यानंतरही त्याची वाट पाहत बसलेला कुत्रा किंवा अन्नपाणी सोडून दिलेला कुत्रा अशा बातम्या याआधीही अनेकदा समोर आल्या आहेत. करोनाच्या संसर्गाच्या काळामध्ये चीनमधील अशीच एक बातमी आता समोर आली आहे. येथील एक कुत्रा त्याच्या मालकाच्या मृत्यूनंतरही रोज रुग्णालयाच्या दाराशी येऊन बसत असल्याचे वृत्त न्यू यॉर्क पोस्टने दिलं आहे.

फेब्रुवारी महिन्यामध्ये करोनाचा उद्रेक झाला त्या हुबेई प्रांतांमध्ये करोनाने थैमान घातले होते. मिळालेल्या माहितीनुसार याच कालावधीमध्ये टीकँग रुग्णालयामध्ये एका व्यक्तीला करोनाचा लागण झाल्यामुळे दाखल करण्यात आलं. पाचव्या दिवशी उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला. मात्र या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्याच दिवसापासून या व्यक्तीचा पाळीव कुत्रा रुग्णालयाच्या लॉबीमध्ये बसून आपल्या मालकाची वाट पाहत आहे. आज या घटनेला तीन महिने उलटून गेल्यानंतरही रोज हा कुत्रा या ठिकाणी येऊन आपल्या मालकाची वाट पाहत बसायचा. नुकतीच काही प्राणीमित्रांनी या कुत्र्याची व्यवस्था शेल्टर होममध्ये केली आहे. आज ना उद्या आपला मालक रुग्णालयामधून बाहेर येईल या आशेने हा कुत्रा रुग्णालयाच्या लॉबीमध्येच बसून असायचा.

माँग्रेल प्रजातीच्या या सात वर्ष वयाच्या कुत्र्याचे नाव झिओ बाओ (Xiao Bao) असं आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या कुत्र्याला येथून हटवण्यासाठी रुग्णालयामधील कर्मचाऱ्यांनी अनेक प्रयत्न केले त्याला प्रलोभने दाखवण्यात आली. मात्र हा कुत्रा तीन महिने या ठिकाणी येत होता. एप्रिलच्या मध्यात चीनमधील निर्बंध शिथिल झाल्यानंतर रुग्णालयाजवळच्या सुपरमार्केटमधून या कुत्र्याच्या खाण्याची सोय करण्यात आली.

“रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मला दिलेल्या माहितीनुसार या कुत्र्याच्या वयस्कर मालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. करोनामुळे या व्यक्तीचा मृत्यू झाला. मात्र त्यानंतरही हा कुत्रा रुग्णालयाच्या लॉबीत बसून आपल्या मालकाची वाट पाहत बसलेला दिसायचा. कुत्र्याच्या या वागण्याने मी भारावून गेलो आणि मी त्याच्या खाण्याच्या व्यवस्था करु लागलो,” असं सुपर मार्केटच्या मालकाने सांगितलं.

काही दिवसांपूर्वीच या कुत्र्याला वुहान स्मॉल अॅनिमल प्रोटेक्शन असोसिएशनने शेल्टर होममध्ये हलवले आहे.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.