https://images.loksatta.com/2020/05/Aurangabad-Bhajiwala.jpg?w=830

…अडचणीत असाल तर मोफत न्या ! मनाची श्रीमंती दाखवणाऱ्या मराठमोळ्या भाजीवाल्याची गोष्ट

गरजू व्यक्तींना देतोय मोफत भाजी

by

करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाउन जाहीर केलं. ३१ मे पर्यंत संपूर्ण देशात लॉकडाउन असणार आहे. या खडतर काळात देशातील अनेक उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होतोय. अनेक लोकांना आपल्या नोकऱ्या या काळात गमवाव्या लागल्या आहेत. मात्र औरंगाबादमधील एका तरुणाने नोकरी गमावल्यानंतरही परिस्थितीसमोर हार न मानता, भाजीचा व्यवसाय सुरु केला आहे. हा व्यवसाय सुरु करत असताना, गोर-गरीब लोकांच्या गरजेचा विचार करुन या तरुणाने, आपल्या हातगाडीवर…शक्य असल्यास विकत घ्या, अडचणीत असाल तर मोफत न्या ! अशी पाटी लावली आहे. राहुल लबाडे असं या तरुणाचं नाव असून गेल्या काही दिवसात…राहुलचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

पदवीधर असलेला राहुल एका खासगी कंपनीत काम करतो. लॉकडाउन काळात कंपनीकडून पगार मिळणं बंद झाल्यानंतर राहुलने हातगाडीवरुन भाजी विकण्याचं ठरवलं. सुरुवातीला राहुल बाजारभावाप्रमाणे भाजी विकत होता. मात्र काही दिवसांपूर्वी त्याच्या हातगाडीवर भाजी विकत घेण्यासाठी आलेल्या एका महिलेमुळे राहुलचा दृष्टीकोनच बदलला. “एक म्हातारी बाई माझ्याकडे आली आणि म्हणाली की मला भाजी हवी आहे, पण माझ्याकडे फक्त ५ रुपये आहेत. आता ५ रुपयात मी त्यांना काय भाजी देऊ हा प्रश्न मला पडला. अखेरीस मी त्यांना मोफत भाजी द्यायचं ठरवलं. त्यावेळी मी गरजू लोकांना मोफत भाजी द्यायचं ठरवलं. यासाठी माझ्या गाडीवर मी खास पाटीही लावली.” राहुल पीटीआयशी बोलत होता.

गेल्या ३ दिवसांमध्ये राहुलने आतापर्यंत किमान १०० गरजू लोकांना मदत केली आहे. “आतापर्यंत मी किमान २ हजार रुपयांची भाजी मोफत वाटली आहे. जोपर्यंत मला हे शक्य होणार आहे तोपर्यंत मी नक्की करेन. रात्री झोपताना कोणताही माणूस उपाशीपोटी झोपू नये एवढीच माझी इच्छा आहे.” आपल्या गाडीवर येणाऱ्या अनेक गरजू लोकांना मोफत भाजी मागण्यात लाज वाटते. पण सध्या त्यांच्यावर परिस्थितीच अशी आलेली आहे की कोणीच काही करु शकत नाही. अशावेळी ते माझ्यापाशी येत दबक्या आवाजात भाजी मिळेल का असं विचारतात…अशा लोकांना मदत करुन मी समाजाप्रती माझं कर्तव्य पूर्ण करतोय अशी भावना राहुलने यावेळी व्यक्त केली.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.