IPL प्रेमींनो, थोडं थांबा… T20 वर्ल्ड कपबद्दल ICC ने दिली महत्त्वाची माहिती
२०२१ ला भारतात टी २० विश्वचषक नियोजित
by लोकसत्ता ऑनलाइनकरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियात रंगणारी टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा पुढे ढकलण्यात येणार असल्याच्या चर्चा सध्या रंगत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) याविषयी अधिकृत घोषणा करण्याची शक्यता असून IPL 2020 चे आयोजन ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान केले जाईल. तसेच २०२१ ला भारतात टी २० विश्वचषक असल्याने २०२० चा विश्वचषक २०२२ मध्ये घेण्यात येईल अशा चर्चांनाही उधाण आले आहे. मात्र या साऱ्या चर्चांवर ICC च्या प्रवक्त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी २० क्रिकेट विश्वचषक २०२० या स्पर्धेच्या तारखा लांबणीवर टाकण्याचा कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच सर्व प्रकारची तयारी केली जात आहे. या स्पर्धेबाबतचा मुद्दा उद्या (२८ मे) होणाऱ्या बैठकीत चर्चेसाठी उपस्थित करण्यात येणार आहे. त्यावर नीट चर्चा झाली की मग अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्टीकरण ICC चे प्रवक्ते यांनी एएनआयला दिले.
ऑस्ट्रेलियामध्ये २०२० साली होणाऱ्या T20 World Cup 2020 स्पर्धेवर करोनाचे सावट आहे. करोनाच्या तडाख्यामुळे टी २० विश्वचषक स्पर्धा २०२० लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. ICC च्या क्रिकेट समितीची नुकतीच महत्त्वाची बैठक पार पडली. त्यात टी २० विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनावरदेखील चर्चा झाली. त्यानुसार टी २० विश्वचषक हा नियोजित ओक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत खेळवणे शक्य नसल्याचे सांगण्यात आल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले होते. मात्र बुधवारी (२८ मे) पुन्हा एकदा या संबंधी चर्चा करण्यासाठी बैठक होणार आहे. त्या बैठकीत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे ICC प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले आहे.
विश्वचषक पुढे ढकलण्यात आला तर ‘या’ तीन पर्यायांबाबत चर्चेची शक्यता
१. क्रिकेट ऑस्ट्रेलिया फेब्रुवारी-मार्च २०२१ दरम्यान टी २० विश्वचषकाचे आयोजन करू शकते. पण त्या काळात असलेला इंग्लंडचा भारत दौरा आणि त्यानंतर IPL 2021 चे आयोजन करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत स्टार इंडियाला भारताच्या उभय देशांतील मालिकेच्या प्रसारणाचे हक्क आणि ICC च्या स्पर्धेच्या प्रसारणाचे हक्क अशा दोन्ही गोष्टी देणे याला ब्रॉडकास्टर्स विरोध करू शकतात.
२. २०२१ च्या टी २० क्रिकेट विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे. अशा परिस्थितीमध्ये २०२१ च्या विश्वचषकाचे यजमानपद ऑस्ट्रेलियाला देऊन २०२२ चे टी २० विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारत स्वत:कडे घेण्याचा पर्याय आहे. मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी आताच क्रिकेट ऑस्ट्रेलियाला मदत करत आहे. अशा परिस्थितीत विश्वचषक स्पर्धांच्या आयोजनाची आदलाबदली करण्यास भारत कितपत तयार होईल याबाबत साशंकता आहे.
३. ऑस्ट्रेलियाने थेट २०२२ चा विश्वचषक आयोजित करण्याचा विचार करावा. कारण ICC ने २०२२ मधील मोठ्या स्पर्धांच्या घोषणा अद्याप तरी केलेल्या नाहीत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.