महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी का? जाणून घ्या जनमत
फेसबुक आणि ट्विटरवर घेण्यात आलं जनमत
by लोकसत्ता ऑनलाइनमहाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटी लागू करावी का?, अशी चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने मंगळवारी फेसबुक आणि ट्विटरवर जनमत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. काही तासांसाठी घेण्यात आलेल्या या पोलमध्ये फेसबुक आणि ट्विटरवरील वाचकांनी आपला कौल नोंदवला.
या सर्वेक्षणामध्ये अवघ्या तीन तासांमध्ये फेसबुकवर १२ हजार ६०० हून अधिक जणांनी आपले मत नोंदवले. त्यापैकी ७२ टक्के वाचकांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी योग्य नसल्याच्या बाजूने मत मांडले. तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी असं मत मांडणाऱ्या वाचकांची संख्या २८ टक्के इतकी होती. म्हणजेच १२ हजारांपैकी साडेतीन हजार जणांनी ही मागणी योग्य असल्याचे म्हटले. तर ही मागणी अयोग्य असल्याचे मत व्यक्त करणाऱ्यांची संख्या नऊ हजारहून अधिक होती.
ट्विटरवरही या सर्वेक्षणामध्ये हो आणि नाही अशी मत नोंदवणाऱ्यांची संख्या जवळजवळ समानच होती. ट्विटरवर तीन तासामध्ये ८ हजार ४१४ जणांनी आपले मत नोंदवले. त्यापैकी ५१ टक्के वाचकांनी होय राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी योग्य असल्याचं म्हटलं तर ४९ टक्के वाचकांनी ही मागणी योग्य नसल्याचे मत नोंदवले. म्हणजेच ४ हजार २९० वाचकांनी ‘होय’ हा पर्याय निवडला तर ४ हजार १२३ जणांनी ‘नाही’ हा पर्याय निवडला.
नक्की वाचा >> राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?; महाराष्ट्रात आतापर्यंत किती वेळा लागू झाली?
राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्याच्या बाजूने मत नोंदवणाऱ्या आणि विरोध करणाऱ्या मतांमधील ट्विटवरील अंतर हे १६७ इतके होते. तर फेसबुकवर हाच फरक ६ हजारहून अधिक होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.