https://images.loksatta.com/2020/05/anjali-damania1.jpg?w=830

“हा विनोद आहे की, तुम्ही अपरिपक्व आहात?”, अंजली दमानिया यांचा पीयूष गोयल यांना सवाल

हजारो मजुरांनी रांगेत उभं राहावं, अशी तुमची अपेक्षा आहे का?

by

मजुरांना घरी पोहोचवण्यासाठी सोडण्यात येणाऱ्या विशेष श्रमिक रेल्वे गाड्यांचा वाद दिवसेंदिवस वाढतच चालला असल्याचं दिसत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रमिक रेल्वे गाड्यांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल हे आक्रमक झाल्याचं दिसलं. त्यानंतर रेल्वे मंत्रालयानं महाराष्ट्रातील गाड्यांची संख्या वाढवली. याच मुद्यावरून “हा विनोद आहे की, तुम्ही अपरिपक्व आहात?,” असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पीयूष गोयल यांना केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (२५ मे) राज्यातील जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी स्थलांतरित मजुरांच्या विषयावरही भूमिका मांडली होती. त्यानंतर अचानक विशेष श्रमिक रेल्वे गाड्यांची संख्या वाढवण्यावरून आणि त्यातील काही गाड्या रद्द केल्यानं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला. “पीयूष गोयलजी, हा विनोद आहे की, तुम्ही अपरिपक्व आहात. ८ रेल्वे गाड्या सोडल्या जात असताना अचानक ४१ रेल्वे गाड्या सोडण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर दहा रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या. हजारो मजुरांनी रांगेत उभं राहावं, अशी तुमची अपेक्षा आहे का? पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, बीएमसी कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्था यांच्यासह आम्ही पहाटे साडेचार वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर धडपड करत होतो. ना अन्न होतं, ना पाणी,” असं ट्विट करून दमानिया यांनी गोयल यांना प्रश्न उपस्थित केला आहे.

“राज्याकडून ८० रेल्वे गाड्यांची मागणी केली जात असताना रेल्वे मंत्रालयाकडून ३० ते ४० गाड्या सोडल्या जात आहेत,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं होतं. त्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल सोशल मीडियातून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. या ‘ट्विटवॉर’नंतर रेल्वे मंत्रालयाकडून गाड्यांची संख्या वाढवण्यात आली असून, पीयूष गोयल यांनी वेळेत रेल्वे स्थानकावर प्रवाशांना आणण्याची सोय राज्य सरकारनं करावी अशी विनंती केली होती.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.