लॅण्डींग करताना करोनामुळे विमानतळ बंद असल्याचं समजलं अन्…
एक हजार किमी प्रवासानंतर लॅण्डींग करण्यासाठी परवानगी मागितली मात्र...
by लोकसत्ता ऑनलाइनकरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जगभरातील अनेक देशांनी हळूहळू जनजीवन पूर्वपदावर आणण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात सुरुवात केली आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउननंतर आता निर्बंध शिथिल करत सेवा सुरु केल्या जात आहे. अनेक देशांमध्ये विमानसेवाही सुरु करण्यात आल्या आहेत. नवे नियम आणि करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून घेण्यात येणाऱ्या खबरदारीमुळे विमानतळांवरील चित्र अगदीच वेगळे दिसत आहे. एकीकडे धाकधुक लागून राहिलेली असतानाच दुसरीकडे अनेकजण गरज असल्यामुळे प्रवास करताना दिसत आहेत. मात्र याच साऱ्यामध्ये जर्मनीच्या युरोविंग या विमान कंपनीने एक विचित्र गोंधळ घातल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे.
युरोविंगने शनिवारपासून आपली सेवा सुरु केली आहे. शनिवारी इटलीच्या डसेलडोर्फहून सार्डिनियासाठी विमान झेपावले. मात्र काही तासांनंतर या विमानाला इच्छित विमानतळावर उतरण्याची परवानगीच नाकरण्यात आली. हे विमान ऑल्बिया विमानतळावर उतरणं अपेक्षित होतं. मात्र ऑल्बिया विमानतळावरील सेवा अद्याप सुरु करण्यात आलेली नाही. त्यामुळेच अगदी विमानतळाजवळ पोहचून या विमानाला परत फिरावं लागल्याचे वृत्त सीएनएनने दिलं आहे.
२३ मे रोजी सकाळी सार्डिनियामधील ऑल्बियाला जाण्यासाठी युरोविंगचे इडब्लू ९८४४ हे विमान आकाशात झेपावले. एक हजार १७० किमीचा प्रवास करुन हे विमान सार्डिनियन हवाई क्षेत्रामध्ये शिरले. त्यावेळी तेथील हवाई नियंत्रण कक्षाने ऑल्बिया विमानतळ अद्यापही बंद असल्याचे वैमानिकांना कळवले. विमानाने उड्डाण करण्याआधी यासंदर्भातील माहिती सार्डिनियन हवाई नियंत्रण कक्षाला देण्यात आली नसल्याची माहिती नंतर उघड झाली. त्यामुळेच अगली लॅण्डींगच्या तयारीत असणाऱ्या विमानाला परवानगीसाठी वाट पाहत हवेमध्ये बऱ्याच काळ घिरट्या घालाव्या लागल्या.
एअरबस ए ३२० प्रकारचे हे विमान बराच वेळ आकाशामध्ये घिरट्या घालत होते. या विमानाने ऑल्बिया विमानतळावर उतरण्याची परवानगी मागितली मात्र ती देण्यात आली आहे. त्यानंतर या विमानाला १९३ किमी दूर असणाऱ्या कॅग्लियारी विमानतळावर उतरवण्यात आल्याचे वृत्त इटलीमधील ‘कॅरीरी डेला सेरा’ने दिलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.