मुंबई, पुणे पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याची अफवा; सोशल मीडियावरचा संदेश खोटा
कुठल्याही व्हायरल व्हॉट्सअॅप मेसेजवर विश्वास ठेवू नका - राज्य शासन
by लोकसत्ता ऑनलाइनकरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याचा सोशल मीडियावरून व्हायरल झालेला मेसेज खोटा असून ती केवळ अफवा आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा खोट्या मेसेजवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आले आहे. तसेच असे खोटे मेसेज फॉरवर्ड करु नयेत अन्यथा संबंधित सोशल मीडिया अॅडमिनवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
वाढत्या करोनाच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि पुणे ही दोन शहरे येत्या शनिवारपासून १० दिवसांसाठी पूर्णत: लष्कराच्या लॉकडाउनमध्ये असणार, त्यासाठी नागरिकांनी सर्व जीवनावश्यक गोष्टींचा साठा करुन ठेवावा. ही दोन्ही शहरं आता लष्कराच्या ताब्यात देण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाची सध्या एक बैठक सुरु असून कोणत्याही क्षणी पूर्णपणे बंदचा निर्णय घेतला जाईल, अशी खोटी माहिती या व्हायरल पोस्टमध्ये देण्यात आली आहे.
मात्र, ही पोस्ट पूर्णपणे खोडसाळ असून अफवा पसरविण्याच्या उद्देशाने ती टाकण्यात आली आहे, तसेच सध्या ती प्रचंड व्हायरल झाली असून नागरिकांनी या खोट्या मेसेजवर विश्वास ठेवू नये, तसेच ती सोशल मीडियातून व्हायरलही करु नये, अन्यथा पोलिसांच्या सायबर सेलकडून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.