ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद
पावसाळ्यापूर्वीची महत्त्वाची कामे प्रशासनातर्फे शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून हाती घेण्यात येणार आहे.
by लोकसत्ता टीमठाणे : ठाणे महापालिकेच्या पिसे उदंचन केंद्र आणि टेमघर जलशुद्धीकरण केंद्रतील पावसाळ्यापूर्वीची महत्त्वाची कामे प्रशासनातर्फे शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, गांधीनगर, जॉन्सन, इटरनिटी, समतानगर ऋतूपार्क, सिद्धेश्वर जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा-कोळीवाडा, शैलेशनगर, संजय नगर आणि कळव्यातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहिणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील उदंचन केंद्र आणि टेमघर येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या सब स्टेशनमधील महत्वपूर्ण अभियांत्रिकी काम पावसाळ्यापूर्वी करणे गरजेचे असल्याने हे काम पूर्ण करण्यासाठी पालिका प्रशासनाने नियोजन केले आहे. हे काम शुक्रवार, २९ मे रोजी सकाळी ९ वाजेपासून रात्री ९ वाजेपर्यंत महापालिका प्रशासनातर्फे हाती घेण्यात येणार आहे. तसेच या कामानंतर शहरातील पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून नागरिकांना पाणीटंचाईचा सामाना करावा लागण्याची शक्यता आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.