मृतदेह ठेवायचे कुठे?
पालिका शवागारात जागा कमी पडत असल्याने अडचणी
by लोकसत्ता टीमपालिका शवागारात जागा कमी पडत असल्याने अडचणी
नवी मुंबई : अठरा मृतदेह ठेवण्याची क्षमता असलेले नवी मुंबई पालिका रुग्णालयातील शवागार आता कमी पडू लागले आहे. दाटीवाटीने एका कपाटात दोन-दोन मृतदेह ठेवले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र पालिका आयुक्तांनी हे शवागार पुरेसे असल्याचे सांगितले.
नियमित आजारांसह आता करोनामुळे मृत व्यक्तींचे प्रमाण वाढले आहे. करोना किंवा इतर आजारामुळे एखादी व्यक्ती मृत पावली तर तिचा अहवाल येईपर्यंत मृतदेह पालिका रुग्णालयातील शवागारात ठेवला जातो. सध्या हे अहवाल येण्यास विलंब होत असल्याने शवागारातील मृतदेहांचे प्रमाण वाढले आहे. या शवागारातून मृतदेहाच्या अदलाबदलीचा प्रकारही घडला आहे.
संपूर्ण नवी मुंबईत एकच शवागार आहे. पालिका रुग्णालयातील या शवागारात तीन-तीन कपाट (डीफ्रिज) असून त्यात प्रत्येकी सहा कप्पे आहेत. एकूण १८ मृतदेह ठेवण्याची क्षमता आहे. मात्र सध्या करोनामुळे मृतदेह वाढत आहेत. तसेच करोना अहवाल व इतर कारणाने मृत्यू झाल्याचा अहवाल येण्यास चार ते पाच दिवसांचा कालावधी लागत असल्याने हे मृतदेह या शवागारातच ठेवले जातात. अहवाल आल्यानंतर ते कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जातात. त्यात करोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नातेवाईक मृतदेह घेण्यास येत नसल्याचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे मृतदेह या शवागारात पडून राहतात. त्यामुळे दाटीवाटीने एकाच कप्प्यात दोन-दोन मृतदेह ठेवण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या शवागारात उरण, पनवेल या इतर ठिकाणाहून देखील मृतदेह येत आहेत. त्यामुळे शवागारावर ताण पडत आहे. मात्र नवी मुंबई शहरासाठी हे शवागार पुरेसे आहे.
-अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.