सोनेच तारणहार
करोनाकाळात आर्थिक टंचाईवर मात; बँकाकडून व्याज दर कमी
by सुहास बिऱ्हाडेकरोनाकाळात आर्थिक टंचाईवर मात; बँकाकडून व्याज दर कमी
सुहास बिऱ्हाडे, लोकसत्ता
वसई : करोनामुळे बंद असलेले उद्योगधंदे, वेतन कपात आणि हातचा रोजगार गेल्याने यामुळे नागरिकांना आता मोठय़ा प्रमाणात आर्थिक टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे आता लोकांचा पैशांसाठी सोने तारण ठेवून कर्ज घेण्याकडे कल वाढला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी वसईतील विविध बँकांनीदेखील सोन्यावरील व्याज दर कमी केले आहेत.
करोना विषाणूच्या संकटामुळे दोन महिन्यांपासून टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. या टाळेबंदीमुळे अनेकांना नोकर्म्या गमवाल्या लागल्या आहेत. ज्यांचे पगार सुरू आहेत त्यांच्या वेतनात कपात करण्यात आली आहे. तर दुसरीकडे उद्योग, व्यवसाय तसेच इतर व्यवहार बंद असल्याने सर्व आर्थिक कामे ठप्प झाली आहेत. गाठीशी असलेले पैसे संपू लागल्याने लोकांना मोठी आर्थिक चणचण भेडसावू लागली आहे. त्यामुळे पैसे घेण्यासाठी आता नागरिकांना सोने तारण ठेवून (गोल्ड लोन) घेण्याला पसंती दिली आहे. सोन्याला किंमत असल्याने सोने तारण ठेवून तात्काळ कर्ज अर्थात रोख रक्कम मिळते. सध्या वसई-विरार मधील अनेक बँकांमध्ये सोने तारण ठेवून कर्ज घेण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसत आहे. बँकांनीही सामाजिक बांधिलकी दाखवत सोन्याच्या व्याजदरावरील कर्ज कमी केले आहे. वसई विकास बँक, वसई जनता, बॅसीन कॅथोलिक आदी बँकांनी देखील पावणे नऊ टक्के दराने सोने तारण कर्ज दिले आहे.
वसई विकास बँकेच्या २१ शाखांमधून मागील १५ दिवसांत ११७ जणांनी सोने तारण ठेवून कर्ज घेतले आहे. सोने तारण ठेवतांना सोन्याचे मूल्यमापन करण्यासाठी सराफांना बँकेत जागा देण्याची आम्ही तयारी दिली आहे. त्यासाठी सहकार आयुक्तांनाही पत्र देत आहोत, अशी माहिती वसई विकास बँकेचे अध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी दिली.
आमच्या बँकेत कर्ज घेण्यासाठी ग्राहक येत आहेत. या संकट काळात त्यांना अधिक भार नको यासाठी आम्ही त्यांना विशेष सवलत दिली आहे. पहिले तीन महिने व्याज भरले नाही तर व्याजावर व्याज लागणार नाही, अशी माहिती वसई जनता बॅंकेचे अध्यक्ष महेश देसाई यांनी दिली.
प्रथम व्याज भरण्याची सवलत
बॅसीन कॅथोलिक बँकेनेसुद्धा या काळात मदतीसाठी पुढे आली आहे. मागील १५ दिवसांत बँकेने पाच कोटींचे कर्ज वाटप केले आहे. सोने तारण कर्ज (गोल्ड) लोन देण्यासाठी बँकेने व्याजदर कमी केले आहेत. याशिवाय उद्योजकांना आर्थिक मदतीचा हात देण्याासाठी ‘बीसीसी असिस्ट’ ही योजना सुरू केली आहे. दोन वर्षांच्या या योजनेअंतर्गत उद्योजकांना पहिल्या वर्षी मुद्दल न भरता केवळ व्याज भरण्याची सवलत देण्यात आल्याची माहिती बॅसीन कॅथॉलिक बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रिजदिना कुटिन्हो यांनी दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.