https://images.loksatta.com/2020/05/mango-1.jpg?w=830

हापूसचा हंगाम शेवटच्या टप्प्यात

सरासरी तीस हजार पेटय़ांची आवक

by

सरासरी तीस हजार पेटय़ांची आवक

नवी मुंबई : कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. रत्नागिरी देवगड हापूस आंब्याची आवक किरकोळ तर  रायगड जिल्ह्य़ातील हापूस आंब्याची आवक मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. पुढील आठ दिवस हा बहर राहणार असून त्यानंतर कोकणातील हापूस आंब्याची आवक बंद होणार आहे. पावसाच्या आगमनामुळे हापूस आंबा काढून घाऊक बाजारात पाठविण्याची अहमिका सुरू आहे.

कोकणातील हापूस आंब्यावर यंदा अनेक संकटे आली. त्यात टाळेबंदीमुळे  फवारणीचा खर्च तरी निघेल का याबद्दल बागायतदारांना शंका होती.  पण त्यातून मार्ग काढण्यात बागायतदार काही अंशी यशस्वी झाले आहेत. थेट हापूस आंबा विक्रीमुळे कोकणातील हापूस आंबा यंदा राज्यातील शेवटच्या टोकापर्यंत जाऊ शकला आहे. थेट विक्री हा एक सक्षम पर्याय निर्माण झाल्याचे बागायतदारांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्य़ातील देवगड तालुक्याचा हापूस आंबा हा जगात सर्वाधिक खप असलेला हापूस असून त्याचा हंगाम संपुष्टात आला आहे. रायगड जिल्ह्य़ातील अलिबागसारख्या काही भागांत हापूस आंब्याचे उत्पादन गेल्या काही वर्षांपासून घेतले जात असून हा आंबा सध्या घाऊक बाजारात पाठविला जात आहे. त्यामुळे कोकणातील हापूस आंब्याची आवक मोठय़ा प्रमाणात वाढलीआहे. यंदा कमी उत्पादन असताना २७ ते ३० हजार पेटय़ा दिवसाला एपीएमसीच्या फळ बाजारात येत असल्याचे फळ बाजार संचालक संजय पानसरे यांनी सांगितले. हा हंगाम पुढील आठ ते दहा दिवस टिकणार असून यानंतर गुजरात व कर्नाटक या आजूबाजूच्या राज्यातील हापूस आंब्याची आवक सुरू होणार आहे.

थेट विक्रीमुळे फसवणूक टळली

टाळेबंदीमुळे हापूसची या वर्षी थेट विक्री मोठय़ा प्रमाणात करण्यात आली. त्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांकडून हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंब्याची होत असलेली विक्री या वर्षी कमी प्रमाणात झाली. ग्राहकांना हापूसची अस्सल चव चाखता आली.  चाळीस टक्के होणारी ही भेसळ या वर्षी अल्प प्रमाणात झाली, असे फळ व्यापारी संजय पिंगळे यांनी सांगितले.

२०० ते ३०० रुपये डझन

आवक मोठय़ा प्रमाणात वाढल्याने चांगल्या प्रकारचा व मोठय़ा आकाराचा हापूस आंबा आता २०० ते ३०० रुपये डझनवारीने मिळत आहे. हवामान विभागाने यंदा पावसाचे लवकर आगमन होणार असल्याचे भाकीत केल्याने शिल्लक हापूस आंबा झाडावरून काढून घाऊक बाजारात मिळेल त्या भावात पाठविण्याची अहमिका सुरू झाली आहे. त्यामुळे कोकणातील हापूस आंबा खवय्यांना आता ही शेवटची संधी आहे.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.