https://images.loksatta.com/2020/05/nsk09-2.jpg?w=830
बाजार समिती बंद असल्याने भाजीपाल्याची समितीच्या बाहेर अशी विक्री झाली. (छाया- यतीश भानू)

भाजीपाल्याचे दर कडाडले

बाजार समिती बंद; दुकान सुरु  ठेवणाऱ्यांवर कारवाई

by

बाजार समिती बंद; दुकान सुरु  ठेवणाऱ्यांवर कारवाई

नाशिक : करोनाबाधित रुग्ण आढळल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समिती तीन दिवस बंद ठेवली असताना मंगळवारी कांदा, बटाटे विक्री करणाऱ्या चार ते पाच व्यापाऱ्यांच्या दुकानांना समितीने कुलुप ठोकले. लिलाव बंद राहिल्याने ग्रामीण भागातून भाजीपाला घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची अडचण झाली. त्यांनी बाजार समितीबाहेर माल विकला. बाजार समिती बंद राहिल्याने दैनंदिन दोन ते अडीच कोटींची उलाढाल थंडावली आहे. दुसरीकडे बाजार समिती बंद असल्याने किरकोळ विक्रेत्यांनी भाजीपाल्याचे दर वाढवून ग्राहकांची लुबाडणूक सुरू केली आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कार्यरत व्यापारी आणि परिसरातील हॉटेल व्यावसायिक यांचे अहवाल सकारात्मक आल्यामुळे बाजार समितीने २६ ते २८ मे या कालावधीत पंचवटी बाजार समिती आणि शरदचंद्र पवार फळ बाजारात लिलाव बंद ठेवला आहे. मंगळवारी बाजार समितीच्या आवारात औषध फवारणीचे काम हाती घेण्यात आले.

शरदचंद्र पवार बाजारात कांदा बटाटे आणि फळांचा स्वतंत्र विभाग आहे. समितीने सूचना देऊनही चार ते पाच व्यापाऱ्यांनी दुकाने उघडी ठेवली होती. ही बाब लक्षात आल्यानंतर समितीच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित दुकानांना टाळे ठोकल्याचे सभापती संपत सकाळे यांनी सांगितले.

फळ व्यापाऱ्यांकडे तयार झालेले आंबे होते. खराब होऊ नये म्हणून सकाळी काही काळ त्यांना विक्रीची मुभा देण्यात आली. पुढील दोन दिवस बाजार समितीची सर्व प्रवेशद्वारे

बंद राहतील. कोणतेही दुकान उघडणार नाही आणि ग्राहकांना आतमध्ये प्रवेश मिळणार नसल्याचे सकाळे यांनी सूचित केले. बाजार समितीत दररोज दोन ते अडीच कोटींची उलाढाल होते. तीन दिवसात सहा ते सात कोटींची उलाढाल ठप्प राहणार आहे.

बाजार समिती बंद असल्याचा फायदा किरकोळ व्यापारी घेत आहेत. किरकोळ बाजारात भाजीपाल्याच्या दरात लगेच वाढ झाल्याचे चित्र आहे. पहिल्या दिवशी अनेक शेतकरी माल घेऊन विक्रीला आले होते. लिलाव बंद असल्याने त्यांना बाजार समिती बाहेर माल विकावा लागला. तो कमी भावात खरेदी करत किरकोळ विक्रेत्यांनी चांदी करून घेतली. बाजार समितीबाहेर ही विक्री झाल्यामुळे ते आपल्या अखत्यारीत नसल्याचे समितीने म्हटले आहे. बाजार आणखी दोन दिवस बंद राहणार आहे. यामुळे शेतकरी एकतर शेतातून माल काढणार नाही. अन्यथा थेट व्यापाऱ्यांना विकण्याचा त्यांच्याकडे पर्याय आहे.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.