https://images.loksatta.com/2020/05/nsk01-10.jpg?w=830

गोदाकाठावरील धार्मिक विधींना पुन्हा सुरुवात

पुरोहित संघाकडून खबरदारीच्या उपाययोजना 

by

उत्तरक्रिया कर्म, श्राद्ध यांचा समावेश, पुरोहित संघाकडून खबरदारीच्या उपाययोजना   

नाशिक:  टाळेबंदीमुळे बंद झालेले येथील गोदाकाठावरील दशक्रियासह इतर धार्मिक विधी आता पुन्हा सुरू  झाले आहेत. देशपातळीवर लागू असलेल्या टाळेबंदीचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष फटका अनेकांना बसला. भाविक, दशक्रिया विधीसाठी आलेले कुटुंबिय,  पर्यटकांच्या गर्दीने खच्चून भरलेला गोदाकाठ दोन महिन्यापासून मोकळा श्वास घेत होता. गोदाकाठावरील दशक्रिया विधीसह श्राध्द विधीला पुराणात विशेष महत्व असल्याने येथे कायम गर्दी असते. करोनामुळे गर्दी टाळण्यासाठी सर्व विधी बंद ठेवण्यात आले होते.

परिणामी ३०० पेक्षा अधिक पुरोहितांच्या कामावर गदा आली. याशिवाय पुजेचे सामान विकणारे विक्रेते, फुलवाले यांच्यावर आर्थिक संकट ओढावले. परंतु, टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यात शिथीलता आल्याने हे चित्र बदलत आहे.

गोदाकाठावर सकाळी उत्तर क्रिया कर्म, यासह श्राध्द विधी पार पडत आहे. मृत व्यक्तीची शेवटची इच्छा, परंपरेनुसार गोदाकाठावरच अस्थीविसर्जन, उत्तर विधी अशा वेगवेगळ्या कारणांमुळे अनेक जण गोदाकाठी येत असून टाळेबंदीमुळे ही मंडळी थांबली होती.

करोनाच्या सावटामुळे पुरोहित वर्गाकडूनही दक्षता घेण्यात येत आहे. शारीरिक अंतर पथ्य, तोंडाला मुखपट्टी, हात निर्जंतुकीकरण आदी खबरदारी घेतली जात आहे. पुरोहित संघाकडून त्यासंदर्भात योग्य सूचना दिल्या जात आहेत.

पुरोहित संघाचे प्रतिक शुक्ल यांनी पुरोहित संघाकडून करोनाचा फैलाव होणार नाही यासाठी योग्य ती काळजी घेतली जात असल्याचे सांगितले. टाळेबंदीमुळे गोदाकाठावर राहणाऱ्या गोरगरिबांसाठी संघाच्या वतीने मोफत अन्नछत्र सुरू आहे.

त्र्यंबकेश्वरातही विधी बंद

करोना, टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे होणारे नारायण नागबळी, त्रिपिंडी, कालसर्प शांतीसह अन्य विधी बंद आहेत. केवळ स्थानिक लोकांचे उत्तरकार्य या ठिकाणी होत आहे. प्रशासनाने दोन ते तीन लोकांच्या उपस्थितीत दशक्रिया विधी करण्याची परवानगी दिली असतांनाही असे विधी करणाऱ्या पुरोहितांवर प्रशासन गुन्हे दाखल करत आहे. या विरोधात त्र्यंबकेश्वर येथील पुरोहित संघाने आवाज उठवला आहे. पुरोहित संघ आवश्यक खबरदारी घेईल. परंतु, दशक्रिया, अस्थी विर्सजन आदी धार्मिक विधीस बंधन नाही असे प्रशासनाने जाहीर करावे, अशी मागणी संघाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात नगरपरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

सूतक संपले

माझी मोठी वहिनी दीड महिन्यापूर्वी वारली. हे कुटुंब उत्तर प्रदेशातील आझमगढ येथे राहतात.  मी मुंबईला राहतो. प्रवास परवानगी मिळण्यात अडचणी आल्या. आता गोदाकाठावर उत्तर विधी केल्याने आमचे सूतक गेले.

– विजय मिश्रा (मुंबई)

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.